पालकमंत्रिपदावरून होणारे आंदोलन योग्य नाही:एकनाथ शिंदे यांनी दखल घ्यावी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे शिवसेनेला खडेबोल
2 hours ago
1
पालकमंत्रिपदाच्या मुद्यावरून रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले यांच्या समर्थकांकडून होणारी निदर्शने योग्य नाहीत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याची दखल घेतली पाहिजे, अशा स्पष्ट शब्दांत भाजप नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेला खडेबोल सुनावले आहेत. महायुती सरकारने शनिवारी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. त्यात नाशिकचे पालकमंत्रीपद भाजप नेते गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आले, तर रायगडचे पालकत्व महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने या दोन्ही जिल्ह्यांवर दावा सांगितला. त्यांच्या पक्षाच्या दादा भुसे यांनी नाशिकवर, तर भरत गोगावले यांनी रायगडवर दावा सांगितला आहे. विशेषतः भरत गोगावले यांच्या समर्थकांनी या प्रकरणी रायगड जिल्ह्यात रस्त्यावर उतरून निदर्शने सुरू केली आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या नेतृत्वाला त्याची योग्य ती दखल घेण्याचे आवाहन केले आहे. मंत्री भरत गोगावले यांच्या समर्थकांनी पालकमंत्रिपदाच्या मुद्यावरून रस्त्यावर उतरून निदर्शने केली. हे योग्य नाही. अशी निदर्शने त्या पक्षाच्या नेतृत्वाने थांबवली पाहिजेत. नाशिकमधील भाजपची निदर्शने आम्ही रोखली. एकनाथ शिंदे यांनी याची योग्य ती दखल घेतली पाहिजे, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. लाडकी बहीण योजनेचे शिंदेंनी श्रेय घेण्यात काहीच गैर नाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी लाडकी बहीण योजना ही माझी संकल्पना असल्याच्या एकनाथ शिंदे यांच्या दाव्यावरही आपले मत व्यक्त केले. महायुतीत लाडकी बहीण योजनेचे क्रेडिट घेण्याचा कोणताही वाद नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात राबवण्यात आली. ही योजना महायुती सरकारच्या काळात आली. तेव्हा एकनाथ शिंदे यांचे सरकार होते. मुख्यमंत्री हे सरकारचे प्रमुख असतात. त्यामुळे ते म्हणत असतील मी योजना आणली, तर त्यात काहीही गैर नाही, असे ते म्हणाले. संभाजीनगरमधील ठाकरे गटात प्रचंड अस्वस्थता बावनकुळे यांनी यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटात अनेकजण अस्वस्थ असल्याचाही दावा केला. ते म्हणाले, छत्रपती संभाजीनगर येथील ठाकरे गटातील काही पदाधिकाऱ्यांचा काल भाजपमध्ये प्रवेश झाला. आज 15 सरपंच व प्रमुख पदाधिकारी पक्षात आलेत. सद्यस्थितीत ठाकरे गटात प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन वर्षांत ठाकरे गटाला महापालिका व जिल्हा परिषद लढवण्यासही माणसे मिळणार नाहीत. याऊलट भाजपने लोकसभेत महाविजय मिळवला. विधानसभेतही आम्हाला महाविजय मिळाला. आता 2025 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही आम्हाला चांगले यश मिळेल. खैरे - दानवेतील वादामुळे पक्षांत होत आहे का? यावेळी पत्रकारांनी त्यांना चंद्रकांत खैरे व अंबादास दानवे यांच्यातील वादामुळे छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटाचे नेते भाजपमध्ये येत आहेत का? असा सवाल केला. त्यावर बावनकुळे यांनी असे काहीही नसल्याचे स्पष्ट केले. संभाजीनगरमधील पक्षप्रवेश हे चंद्रकांत खैर व अंबादास दानवे यांच्यातील वादामुळे नव्हे तर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसशी केलेल्या आघाडीमुळे होत आहेत. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे विचार स्वीकारले. त्यांनी हिंदुत्त्व सोडून काँग्रेसच्या विचारांशी संगनमत केले. कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्या परभणी व नाशिकमधील रॅलीत पाकिस्तानचा झेंडा फडकताना पाहिला. त्यातून निर्माण झालेल्या अस्वस्थतेमुळे ते भाजपमध्ये येत आहेत, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. राजन साळवी भाजपमध्ये केव्हा येणार? बावनकुळे यांनी यावेळी ठाकरे गटाचे नेते राजन साळवी भाजपमध्ये केव्हा येणार? या प्रश्नालाही उत्तर दिले. ते म्हणाले, माझी त्यांच्याशी चर्चा झाली नाही. एखाद्यावेळी साळवी यांचा विचार बदलू शकतो. उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर ते नाराज आहेत. उद्धव ठाकरे यांची काँग्रेसधार्जिनी विचारधारा ठाकरे गटाच्या कोणत्याही नेत्याला मान्य नाही, असे ते म्हणाले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)