ईव्हीएम पडताळणीPudhari File Photo
Published on
:
22 Jan 2025, 10:34 am
Updated on
:
22 Jan 2025, 10:34 am
ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची तपासणी आणि पडताळणीसाठी आजमितीस माजी खासदार डॉ. सुजय विखे, प्रा. राम शिंदे, शंकरराव गडाख, प्रताप ढाकणे, राहुल जगताप व राणी लंके यांचे अर्ज शिल्लक आहेत. यापैकी गडाख व जगताप या उमेदवारांच्या मागणीनुसार यंत्राची तपासणी होणार आहे. मात्र, उर्वरित विखे, प्रा. शिंदे, ढाकणे व लंके हे न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसारच त्यांनी मागणी केलेल्या यंत्रांची तपासणी होणार आहे.
दरम्यान, ईव्हीएम तपासणी व पडताळणी प्रक्रिया कशी असणार याबाबत या उमेदवारांच्या प्रतिनिधींना मंगळवारी निवडणूक यंत्रणेने माहिती दिली. मात्र, अद्याप ईव्हीएम तपासणीची तारीख निश्चित नसल्याचे यंत्रणेने सांगितले.
लोकसभेच्या अहमदनगर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पराभूत झाले आहे. त्यांनी मतदारसंघातील 44 मतदान केंद्रांवरील ईव्हीएम तपासणी व पडताळणीसाठी शुल्क अदा करीत अर्ज दाखल केला होता. त्यानंतर विजयी उमेदवार नीलेश लंके यांच्या निवडीला त्यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवार बाळासाहेब थोरात, प्रा. राम शिंदे, शंकरराव गडाख, प्रताप ढाकणे, राणी लंके, राहुल जगताप, प्रभावती घोगरे, संदीप वर्पे, प्राजक्त तनपुरे व अभिषेक कळमकर यांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅटवर शंका व्यक्त करीत या यंत्रांची तपासणी व पडताळणी करण्यासाठी सशुल्क अर्ज दाखल केले होते. यापैकी बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे, प्रभावती घोगरे, संदीप वर्पे व अभिषेक कळमकर यांनी तपासणी व पडताळणी प्रक्रियेतून माघार घेतली आहे. त्यामुळे यंत्रांची तपासणी आणि पडताळणीसाठी लोकसभेचे पराभूत उमेदवार डॉ. विखे यांच्यासह विधानसभेचे उमेदवार प्रा. शिंदे, गडाख, जगताप, ढाकणे व लंके यांचे अर्ज शिल्लक आहे. मात्र, अद्याप या प्रक्रियेतून माघार घेण्याची मुदत आहे.
निवडणूक आयोगाने ईव्हीएम तपासणी आणि पडताळणीबाबत हालचाली सुरु केल्या आहेत. त्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी यांना 13 जानेवारी रोजी प्रशिक्षण देण्यात आले आहे.
ईव्हीएम तपासणी आणि पडताळणीबाबत माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (दि.21) जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. विखे यांच्यासह सहा उमेदवारांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती.
प्रतिनिधीला 1400 मतांचा अधिकार
तपासणी आणि पडताळणीसाठी उमेदवारांनी सूचविलेल्या ईव्हीएममधील पूर्वीचा सर्व डेटा नष्ट केला जाणार आहे. त्यानंतर एफएलसीसारखी अल्फाबेटप्रमाणे मतपत्रिका तयार केली जाणार आहे. कंपनीचे अभियंता प्रतिनिधींना डमी मतदान प्रक्रिया करुन दाखविणार आहेत. उमेदवार वा प्रतिनिधींना जास्तीत जास्त 1400 मते देता येणार आहेत. या प्रक्रियेचे व्हिडिओ शुटींग होणार आहे. कोट्यापेक्षा कमी मते दिल्यास मतमोजणीस वेळ कमी लागणार आहे. त्यामुळे कोट्यपेक्षा कमी मतदान प्रतिनिधी करु शकतात. या प्रक्रियेत युनिट तपासणी व पडताळणी दरम्यान अपयशी ठरल्यास आयोगाला अहवाल पाठविला जाणार आहे. तसेच अर्जदाराला रक्कम परत दिली जाणार आहे.