परभणी/मानवत (Parbhani) :- तालुक्यातील मंगरुळ बु. ते रामपुरी बु. रस्त्यावर झुडपात तीन ते चार महिन्याचे मृत अर्भक (infant) बुधवार २२ जानेवारी रोजी पहाटे पाचच्या सुमारास आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. अर्भक फेकणार्यांचा शोध घेतला जात आहे.
चार महिन्याचे अर्भक फेकणार्यांचा शोध सुरू
मंगरुळ बु. ते रामपुरी बु. रस्त्यावर दूध डेअरीच्या थोड्या अंतरावर पोलीस पाटील नाईकनवरे यांना बुधवारी सकाळी झुडपात कागदामध्ये संशयास्पद काहीतरी दिसून आले. जवळ जाऊन त्यांनी पाहणी केल्यावर त्यामध्ये अर्भक होते. पोलीस पाटील नाईकनवरे यांनी तात्काळ याची माहिती मानवत पोलिसांना दिली. सपोनि. संदीप बोरकर, पोलीस अंमलदार भारत नलावडे, विजय लबडे, महेश रणेर, सिध्देश्वर पाळदे, बंकट लटपटे यांनी धाव घेतली. तीन ते चार महिन्याचे मृत अर्भक आहे. वैद्यकीय तपासणी नंतर सदर अर्भक स्त्री जातीचे का पुरुष जातीचे हे समजेल, असे पोलिसांनी सांगितले. अर्भक उत्तरीय तपासणीसाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. अर्भक फेकणार्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.