बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या घटनेमुळे राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणात त्यांनी वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान या प्रकरणानंतर आता सुरेश धस यांच्याकडून मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. सुरेश धस यांच्या या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे.
परळीमधील आणखी दोन हत्येचा खुलासा सुरेश धस यांनी केला आहे . २२ ऑक्टोबर २०२३ ला महादेव मुंडे यांची परळीच्या तहसील कार्यालयासमोर हत्या करण्यात आली होती. हत्येतील आरोपींना अजूनही अटक करण्यात आलेली नाही, हत्येतील आरोपी वाल्मिक कराडच्या मुलाच्या आवतीभवती फिरतात असा आरोपही सुरेश धस यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात वाल्मिक कराडच्या मुलाच्या अडचणीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान सुरेश धस यांनी ज्या महादेव मुंडे यांची हत्या झाल्याचं म्हटलं आहे, त्या महादेव मुंडे यांच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया आता समोर आली आहे. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आपल्याला न्याय मिळावा असं म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या ज्ञानेश्वरी मुंडे?
परळीत माझ्या नवऱ्याची पंधरा महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली, मात्र अजूनही माझ्या कुटुंबाला न्याय मिळालेला नाही, जसं संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये सरकारी पक्षाकडून सीआयडी, एसआयटी स्थापन करण्यात आली होती, तसेच माझ्या नवऱ्याच्या खून प्रकरणातही राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्याच पद्धतीने सीआयडी एसआयटी स्थापन करून गुन्ह्याचा तपास तात्काळ करावा व माझ्या कुटुंबाला न्याय द्यावा असं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, माझ्या पतीचा भिशी व सावकारकीचा व्यवसाय होता, त्यांची कोणाशीही दुश्मनी नव्हती. तरी पण माझ्या पतीला अत्यंत क्रूरपणे मारण्यात आलं. परळी पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सानप यांनी आश्वासन दिले होते की दोन दिवसात आरोपीला पकडले जाईल मात्र त्यांची बदली झाली, असं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी म्हटलं आहे.