पूनम अर्बन को. ऑप.गुंतवणूक प्रकरणात रवींद्र भोयरला अटक करण्यात आली.File Photo
Published on
:
22 Jan 2025, 6:01 pm
Updated on
:
22 Jan 2025, 6:01 pm
नागपूर : कधीकाळी संघाचे निष्ठावान कार्यकर्ते असलेले माजी उपमहापौर, नासूप्रचे विश्वस्त आणि मध्यंतरी काँग्रेसमध्ये गेलेले रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना साडेतीन कोटींच्या गुंतवणूक प्रकरणात अटक करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (दि.२२) सकाळी रेशीमबाग येथील घरातून त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्यांना २५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
रवींद्र भोयर हे २०१९ मध्ये पुनम अर्बन क्रेडीट को ऑप. सोसायटीत संचालक असताना त्यांनी ग्राहकांना भरघोस लाभ आणि परताव्याचे आमिष देत गुंतवणूक करण्यास भाग पाडले. जवळपास शंभराच्यावर ग्राहकांनी तीन कोटी ४१ लाख रुपये गुंतविले. बराच कालावधी लोटल्यानंतरही त्यांना परतावा मिळाला नाही. अखेर विचारपूस करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना ठोस उत्तर मिळत नसल्याने त्रस्त ग्राहकांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून संचालक मंडळातील सदस्यांना अटक केली. यापुर्वी दहा आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी (दि.२२) सकाळी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा सखोल तपास करत रवींद्र भोयर यांना अटक केली.
मध्यंतरी भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी हा नासुप्र विश्वस्त असताना भोयर यांनी केलेल्या व्यवहाराची तक्रार केली होती. यापूर्वी भाजपचे उमेदवार म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसने भोयर यांना काँग्रेसमध्ये आणून तिकीट दिले होते. मात्र ऐनवेळी त्यांची उमेदवारी रद्द करत मंगेश देशमुख या अपक्ष उमेदवाराला काँग्रेसने पाठिंबा दिला होता. त्यामुळे संघ भाजपपासून दूर गेलेल्या रवींद्र भोयर यांची राजकीयदृष्ट्या कोंडी झाली होती. तेव्हापासून भोयर आणि भाजप नेत्यांमध्ये अधिकच वितुष्ठ आल्याचे पाहायला मिळाले. आता पोलिसांच्या या कारवाईनंतर उलट सुलट चर्चा जोरात आहे.