तूर काढताना थ्रेशरमध्ये अडकून युवकाचा मृत्यू झाला.
Published on
:
22 Jan 2025, 8:05 pm
Updated on
:
22 Jan 2025, 8:05 pm
अमरावती : तूर काढणी करत असताना मशीनमध्ये अडकून मजुर युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जिल्ह्यात अंजनगाव सुर्जी तालुक्यात अडगाव खाडे शेत शिवारात बुधवारी (दि.२२) घडली आहे. मशीनमध्ये अडकल्याने युवकाच्या पायाचे तुकडे झाले होते. अंकुश रंगराव सरदार (वय ३२) असे मृतकाचे नाव आहे.
तूर काढणीच्या हेडंबा मळणी यंत्राचा वापर सध्या परिसरात केला जात आहे. दरम्यान या मशीनवर अडगाव नबापूर शेत शिवारात अंकुश रंगराव सरदार (वय ३२) हा उमेश हेंड यांच्या शेतात तुर काढणीच्या कामासाठी गेला होता. अंकुश सरदार तुरीच्या झाडाच्या काड्या यंत्रात टाकण्याचे काम करण्यासाठी मशीन वर चढलेला होता. हे काम करत असताना त्याचा तोल गेल्याने तो मळणी यंत्राच्या कटरमध्ये पडला. यात क्षणार्धात अंकुश मशीनच्या आतमध्ये ओढला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
माहितीनुसार शेवटी राहिलेला तुरीतील काही पाला पाचोळा टाकताना तोल जाऊन अंकुश हडंबा कटरमध्ये पाय अडकला. मशीन चालू असताना कटरने अंकुशला आत ओढल्याने अंकुशचा एक पाय आणि कमरेखालचा पूर्ण भाग आत मध्ये गेल्याने त्या भागाचा चुराडा झाला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत थ्रेशरचे मालक राहुल घिये यांनी घटनेची माहिती अंजनगाव सुर्जी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अंकुशला पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने हडंबा कटर मधून बाहेर काढले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरीता पाठवला. अंकुश पश्श्चात आई, पत्नी, मुलगा , मुलगी असा आप्त परिवार आहे.अंकुशच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहे.