Published on
:
22 Jan 2025, 8:08 pm
Updated on
:
22 Jan 2025, 8:08 pm
नागपूर: पॉंडेचेरीतील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली एका टोळीने दोन विद्यार्थ्यांच्या पालकांची ७५ लाखांनी फसवणूक केली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला. परीमल कोटपल्लीवार,पत्नी सोनम, मिलींद धवड आणि नितीन मल्लतवार अशी या आरोपींची नावे आहेत.
हिराबाई सिद्धार्थ सहारे (५२, उप्पलवाडी) यांच्या मुलीला नीटमध्ये कमी गुण असल्यामुळे तिला एमबीबीएसला प्रवेश मिळाला नव्हता. मात्र, तिला डॉक्टर व्हायचे होते. त्यामुळे तिच्या आईने पैसे भरुन महाविद्यालयात प्रवेश मिळविण्याचे ठरविले. त्यांनी वृत्तपत्रातील जाहिरातीवरुन टेलीफोन एक्स्चेंज परीसरातील आर.के.एज्युकेशन कॉंऊंसलिंग सेंटरवर संपर्क केला. त्यांनी तेथे आरोपी परीमल कोटपल्लीवार याने व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्यासाठी ८५ लाखांची मागणी केली.
सहारे यांनी पैसे देण्यास होकार देऊन ३० लाख ७५ हजार रुपये दिले. दरम्यान, याच टोळीने चंद्रशेखर बावणे यांच्या मुलीलासुद्धा एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली ८ ऑक्टोबर २०२४ ते १५ जानेवारी २०२५ या दरम्यान बावणे यांच्याकडून ४५ लाख रुपये घेतले. मात्र, दोघांच्याही मुलींना प्रवेश मिळवून दिला नाही. या टोळीने याप्रकारे अनेक पालकांची फसवणूक केली असून ती रक्कम कोट्यवधीमध्ये असल्याची माहिती आहे.