बॉलिवूडचा नवाब, अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी पकडले आहे. आता घटना कशी घडली याची माहिती पोलीस घेत आहेत. तसेच केस भक्कम होण्यासाठी पोलीस आवश्यक ते पुरावे गोळा करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आरोपीने वापरलेल्या चाकूचा तुकडा मिळवण्यासाठी पोलीस आज आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादला घेऊन वांद्रे तलावाजवळ आले होते. या तलावात दीड तास शोधाशोध घेतल्यानंतर अखेर पोलिसांनी चाकूचा तुकडा मिळवला आहे. त्यामुळे पोलिसांच्या हाती सर्वात मोठा पुरावा मिळाला आहे.
आज संध्याकाळी पोलीस आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादला घेऊन वांद्रे तलावाच्या इथे आले होते. यावेळी त्याने चाकूचा तुकडा कुठे फेकला याची माहिती घेण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी दीड तास तलावात शोधाशोध करून चाकूचा तुकडा मिळवला आहे. हा चाकूचा तुकडा आरोपीने ओळखल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून तो प्रयोगशाळेत पाठवला असल्याचं सूत्रांनी सांगितलं. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर शहजादने चाकूचा एक तुकडा वांद्रे तलावात फेकला होता. तलवातील खंदकात हा चाकूचा तुकडा फेकण्यात आला होता.
सलूनवाल्याची चौकशी
दरम्यान, सैफवरील हल्ल्यानंतर आरोपी वरळी कोळीवाड्यात आला होता. या ठिकाणी त्याने एका सलूनमध्ये जाऊन दाढी कटिंग केली होती. पोलिसांनी वरळी कोळीवाड्यातील या सलूनवाल्याची चौकशी केली आहे. त्याच्याकडून अधिकची माहिती घेतली आहे. आपली ओळख पटू नये आणि पोलिसांना गुंगारा देता यावा म्हणून त्याने केस कापून लूक बदलण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळेच सलूनमध्ये ज्याने आरोपीचे केस कापले होते, त्याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं. कोर्टात भक्कम पुरावे सादर करता यावेत म्हणून पोलीस प्रत्येक अँगलने या प्रकरणाचा तपास करत आहे.
रिक्षाचालकाची चौकशी
सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात वांद्रे पोलिसांनी एका रिक्षाचालकाला देखील आज पोलिस ठाण्यात बोलविलं होतं. या रिक्षाचालकाचीही पोलिसांनी चौकशी केली. त्याच्याकडूनही आरोपीबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे सदर रिक्षाचालकाने आरोपीला बांद्रा तलाव परिसरात पाहिलं होतं. म्हणून आज पोलिसांनी सदर रिक्षा चालकाला पोलीस ठाण्यात बोलवून त्याची चौकशी केली.