किशोर पाटील, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : पुष्पक एक्सप्रेस दुर्घटनेतील 12 मृतांपैकी सात मृतांची ओळख पडली आहे. यातील चारजण नेपाळचे आहेत. त्यामुळे पोलीस आता या मृतांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधत आहेत. आज जळगाव येथे संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास पुष्पक एक्सप्रेस उभी असताना एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरली. त्यामुळे लोकांनी एक्सप्रेसमधून उड्या मारल्या आणि दुसऱ्या ट्रॅकवरून आलेल्या एक्सप्रेसने या लोकांना उडवलं. त्यात 12 जणांचा जागीच मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले.
रेल्वे अपघातातील 12 मृतांपैकी 7 जणांची ओळख पटली आहे. इतर चार पुरुष आणि एका महिलेची अजून अद्याप ओळख पटलेली नाही. पोलीस प्रवाशांशी विचारपूस करून या मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहे. ओळख पटलेल्या मृतांमध्ये चारजण नेपाळचे आहेत. तर तीन जण हे उत्तर प्रदेशातील रहिवाशी आहेत. तर या दुर्घटनेतील 10 जखमी हे पाचोऱ्यातीलच वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
मयतांची नावे
कमला नवीन भंडारी वय-42 रा. कुलाबा मुंबई, मूळ राहणार नेपाळ
लच्छीराम कन्नु पाशी वय- 40 रा. नेपाळ
नसरुद्दीन बडुद्दीन सिद्धीकी वय-19, जलाहनपुरा जि.गोंडा उत्तर प्रदेश
हिमु नंदराम विश्वकर्मा वय-10 वर्ष रा. नेपाळ
इम्तियाज अली वय-35 रा. गंगाराम, उत्तर प्रदेश
बाबू खान वय-27 रा. कंदोसा, उत्तर प्रदेश
जयकला बटे जयकडी, वय-80 रा. नेपाळ (महिला)
विघ्नहर्ता हॉस्पिटल
पाचोऱ्यातील विघ्नहर्ता या खासगी रुग्णालयात पाच जखमी उपचार घेत आहेत. दीपक राजू थापा, हिऊचला साऊद लालबहादूर शौन, धर्मसाऊद लालबहादूर शौन, मंजू टेकबहादूर आणि अभू मोहम्मद आडबाळ मोहम्मद हे पाच जण विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
वृंद्घावनमध्ये पाचजण
वृंदावन हॉस्पिटलमध्येही पाच जण उपचार घेत आहेत. मोहरम अली निबर अली, पलिम जब्बार अन्सारी, हसन अली सल्लर, विजयकुमार तीरतराम चौधरी आणि उत्तम किरपाराम पासवान हे वृंदावन रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी या दोन्ही रुग्णालयांत जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यानंतर या जखमींचा जबाब नोंदवला आहे. घटना कशी घडली? अफवा कुणी पसरवली? एक्सप्रेसची चैन कुणी खेचली याची माहिती पोलिसांनी घेतली. तसेच अफवा पसरवणाऱ्या चहावाला आणि चैन खेचणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत.