इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी आठवड्यातून 70 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. मेहनत ही वैयक्तिक निवड आहे, ती कधीही लादता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मूर्ती यांच्या मते, लोकांनी स्वत:च्या कामावर आत्मपरीक्षण केले पाहिजे आणि जीवनात पुढे जाण्यासाठी कामाप्रती समर्पणाचे महत्त्व विचारात घेतले पाहिजे.
काय म्हणाले नारायण मूर्ती?
मुंबईतील आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मूर्ती यांनी आपला वैयक्तिक अनुभव सांगितला. ‘मी सकाळी साडेसहा वाजता ऑफिसला जायचो आणि रात्री साडेआठ वाजता ऑफिसमधून बाहेर पडायचो. ही वस्तुस्थिती आहे. गेली 40 वर्ष मी हे काम करत आहे. ते निर्णय माझे वैयक्तिक होते. हे असे मुद्दे आहेत ज्यावर आत्मपरीक्षण करता येते, निष्कर्षापर्यंत पोहोचता येते आणि हवे ते करता येते.’
काम आणि आयुष्य असा समतोल साधा
काम आणि जीवन संतुलनावरून वाद सुरू असताना मूर्ती यांनी हे वक्तव्य केले आहे. गेल्या वर्षी नारायण मूर्ती यांनी या वादाला तोंड फोडले होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी आठवड्यातून 70 तास काम करण्याची शिफारस केली होती.
‘भारताची उत्पादकता जगात सर्वात कमी आहे. आपल्या तरुणांनी म्हणावे, हा माझा देश आहे, मला आठवड्याचे 70 तास काम करायचे आहे’ या वक्तव्यानंतर नारायण मूर्ती यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका करण्यात आली होती. मात्र, अन्य काही व्यावसायिकांनी नारायण मूर्ती यांच्या सूराशी जुळवून घेत अधिकाधिक काम करण्याचा आग्रह धरला आहे.
नुकतेच लार्सन अँड टुब्रोचे चेअरमन एस. एन. सुब्रमण्यम यांनी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून 90 तास काम करावे आणि रविवारीही काम करण्यास संकोच करू नये, असं म्हटलं आहे.
काय म्हणाले सुब्रमण्यम?
लार्सन अँड टुब्रोचे चेअरमन एस. एन. सुब्रमण्यम म्हणाले होते की, ‘मला खेद आहे की मी तुम्हाला रविवारी कामावर आणू शकलो नाही. जर मी तुम्हाला रविवारी काम करायला लावू शकलो तर मला आनंद होईल. कारण, मी रविवारी काम करतो. तुम्ही घरी बसून काय करता? तुम्ही तुमच्या बायकोकडे किती वेळ पाहू शकता? बायका किती वेळ नवऱ्याकडे बघू शकतात? हे सगळं सोडा. ऑफिसमध्ये येऊ तुमचं काम करा.’
यानंतर इंडस्ट्रीत वर्क-लाईफ बॅलन्सबाबत वेगवेगळ्या प्रकारची मतं मांडली जात आहे. आरपीजी एंटरप्रायजेसचे चेअरमन हर्ष गोएंका यांच्या मते, ही यशाची रेसिपी नाही तर थकवा आहे. ‘बरं, हे माझं मत आहे. त्याचप्रमाणे आयटीसी लिमिटेडचे चेअरमन संजीव पुरी यांनी नुकतेच सांगितले की, ‘कर्मचाऱ्यांना त्यांच्या क्षमतेची जाणीव करून देम्यासाठी आणि त्यांचे काम चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी सक्षम करणे कामाच्या तासांच्या संख्येपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे.’