कारवार : कारवार आणि रायचूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत एकूण 14 जण ठार झाले. हावेरीतील सावनूरमधून भाजी आणि फळे घेऊन कुमठ्याच्या दिशेने येणारा ट्रक अरेबैलजवळ उलटून 10 जण ठार झाले, तर 18 जण जखमी झाले. रायचूर जिल्ह्यातील सिंधनूरमध्ये शालेय बसला झालेल्या अपघातात क्रूझरचालक आणि तीन विद्यार्थी असे एकूण चारजण ठार झाले असून, 10 जण जखमी झाले.
यल्लापूरजवळ झालेल्या अपघातात फय्याज इमामसाब जमखंडी (वय 45), वासीम इरुल्ला मुडगेरी (35), इजाज मुस्ताक मुल्ला (20), गुलामहुसेन जवळी (40), इम्तियाज ममजाफर मुळकेरी (36), अल्फाज जाफर मंडक्की (25), जिलानी अब्दुल जकाती (25), अस्लम बाबुली बेण्णी (24), जलाल तारा (30) व सादिक पाशा यांच्यासह दहाजण जागीच ठार झाले.कारवार जिल्हा पोलिसप्रमुख एम. नारायण यांनी दिलेल्या माहितीनुसार, हावेरीतील सावनूरमधून 28 जण फळे आणि भाजी विक्रीसाठी ट्रकने कुमठ्याच्या दिशेने निघाले होते. पहाटे दाट धुके होते. मागील वाहनाला जाण्यासाठी रस्ता देण्याचा प्रयत्न ट्रकचालकाने केला. ट्रक रस्त्याशेजारी घेताना वीजखांबाला धडकून 50 फूट खड्ड्यात कोसळला. ट्रक उलटल्याने 10 जण ठार झाले. उर्वरित 18 जण जखमी असून, त्यांना हुबळीतील किम्सकडे पाठवण्यात आले.
रायचूरमधील अपघातात चार ठार
रायचूर जिल्ह्यातील सिंधनूरमध्ये सकाळी क्रूझरचा टायर फुटून झालेल्या अपघातात चालकासह तिघे विद्यार्थी ठार झाले. हयवदन (18), सुजयेंद्र (22), अभिलाष (20) आणि चालक जमसाली शिवा (20) अशी मृतांची नावे आहेत. क्रूझरमधून 10 विद्यार्थ्यांसह एकूण 14 प्रवासी मंत्रालयहून कोप्पळमधील आनेगुंदीच्या दिशेने जात होते. यामध्ये आंध्र प्रदेशमधील मंत्रालयातील संस्कृत पाठशाळेचे दहा विद्यार्थी होते. जखमी विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. एका विद्यार्थ्याची स्थिती चिंताजनक असल्याची माहिती मंत्रालयाच्या मठाधीशांनी दिली आहे.
कारवार आणि सिंधूनर अपघाताची माहिती ऐकल्यानंतर धक्का बसला. मृतांच्या कुटुंबियांना हे दु:ख पचवण्यासाठी ईश्वराने ताकद द्यावी. कुटुंबियांना प्रत्येकी तीन लाखांची मदत दिली जाईल. जखमींवर मोफत उपचाराची व्यवस्था केली जाईल.
सिद्धरामय्या, मुख्यमंत्री
हावेरी जिल्ह्यातील सावनूरमधील भाजी विक्रेते कारवारमधील अपघातात ठार झाले. मृतांच्या कुटुंबियांना योग्य भरपाई द्यावी. जखमींचा खर्च सरकारने उचलावा. सर्व विक्रेते गरीब कुटुंबातील असून या अपघाताची चौकशी करावी.
बसवराज बोम्मई, खासदार हावेरी
राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील दोन अपघातांमध्ये ठार झालेल्या 14 जणांच्या कुटुंबीयांना हा धक्का सहन करण्याची ईश्वर ताकद देवो असे म्हटले आहे. सोशल मीडियावर त्यांनी याबाबत पोस्ट केले असून पंतप्रधानांनी केंद्रातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाखांची भरपाई जाहीर केली आहे. जखमींवर उपचारासाठी 50 हजार रुपयांची घोषणा केली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सिंधनूर अपघातात मंत्रालयातील तीन विद्यार्थी ठार झाल्याबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.
ट्रकमध्ये लोक असल्याची कल्पनाच नाही
अपघाताची माहिती सुमारे तासानंतर पोलिसांना मिळाली. ट्रक खड्ड्यात उलटल्याने क्रेनसह पोलिस घटनास्थळी गेले. क्रेनने ट्रक उचलल्यानंतर त्याखाली लोक चिरडल्याचे दिसून आले. तोपर्यंत त्यातून भाजी विक्रेते प्रवास करत होते, याची कल्पनाच नव्हती. जखमींना तातडीने यल्लापूर रुग्णालयाकडे पाठवण्यात आले. गंभीर जखमींना हुबळीतील किम्समध्ये पाठविण्यात आले.