Published on
:
22 Jan 2025, 8:06 pm
Updated on
:
22 Jan 2025, 8:06 pm
अमरावती : अमरावती शहरातील कॅम्प परांजपे कॉलनीत राहणार्या यश संजय राठी (वय २२) या युवकाचा मंगळवारी (दि.२१) रात्री नागपूर-कमळेश्वर मार्गावर अपघातात मृत्यू झाला. अपघातानंतर दोन तास यशचा मृतदेह तिथेच पडलेला होता.
यश राठी नागपूर मध्ये डी.वाय. पाटील कॉलेज येथे एमबीए अभ्यासक्रमाला शिकत होता आणि नागपूर येथे तो जॉब देखील करत होता. यश मंगळवारी पेपर असल्यामुळे कॉलेजला गेला होता. त्यानंतर रात्री तो आपल्या मित्राला भेटून रूमवर परत येत होता. दरम्यान यावेळी कळमेश्वर मार्गावर अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मृतदेह दोन तास घटनास्थळावरच पडलेला होता.
बुधवारी (दि.२२) पहाटे तेथून जाणार्या नागरिकांना त्याचा मृतदेह दिसला. ते त्याला घेऊन रुग्णालयात गेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. बुधवारी दुपारी कुटुंबीयांना यशच्या अपघाताची माहिती मिळाली. यश आपला फोन रूमवर ठेवून गेला होता. त्यामुळे तो फोन उचलत नव्हता. कुटुंबीयांनी त्याच्या मित्राला फोन केले,तेव्हा त्यांना अपघाताची माहिती मिळाली. घटनेच्या वेळी तो सावनेर येथे गेला होता. अपघाताची माहिती मिळाल्यावर कुटुंबीय नागपूरला पोहोचले.पोस्टमार्टम नंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. गुरुवारी त्याच्या पार्थिवावर अमरावतीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. या घटनेमुळे कुटुंबासह परिसरात शोककळा पसरली आहे.