Published on
:
22 Jan 2025, 9:49 pm
Updated on
:
22 Jan 2025, 9:49 pm
सोलापूर : यंदाच्या वर्षी शिक्षक अभियोग्यता भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) परीक्षेचा निकाल तत्काळ लागल्यास त्यातील पात्र विद्यार्थ्यांना त्या शिक्षक भरतीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे टीईटी परीक्षेच्या निकालांकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा 10 नोव्हेंबरला घेण्यात आली होती. त्याची उत्तरसूची जाहीर झाली. आता परीक्षेला अडीच महिने उलटले आहेत. यानंतरही शिक्षक अभियोग्यता चाचणी (टीएआयटी) ही पात्रता परीक्षा द्यावी लागणार आहे. परंतु त्यापूर्वी टीईटीचा निकाल आवश्यक आहे. नियोजित वेळापत्रकानुसार निकाल जाहीर झाल्यास उमेदवारांना शिक्षक अभियोग्यता, अल्प भाषिक, अल्पसंख्याक संस्थेच्या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर टीईटीचा निकाल लागावा, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून टीएआयटीही शिक्षक अभियोग्यता परीक्षा (टेट) नाही. यंदा तीन वर्षांनंतर टीईटी परीक्षा झाली आहे. त्यानंतर नोकरीसाठी टीएआयटी (पवित्र पोर्टल शिक्षक अभियोग्यता परीक्षा) परीक्षा आहे.
शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल लवकर लावून पुढील टेट पात्रता परीक्षा व्हावी. वेळेत भरती आणि परीक्षा होत नसल्याने डी. एड आणि बी. एड करण्याचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे टीईटी आणि टेट परीक्षा वर्षांतून किमान एकदा तरी घ्यावी. जेणेकरुन जास्तीत जास्त डी.एड, बी.एड.धारकांना संधी मिळेल.
-अमोल ईश्वरकटी, टीईटीधारक उमेदवार