Published on
:
23 Jan 2025, 1:20 am
Updated on
:
23 Jan 2025, 1:20 am
कुडाळ : कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची निवडणुक 24 जानेवारी रोजी होणार आहे. या अनुषंगाने कुडाळच्या संपूर्ण कार्यक्षेत्रात 22 जानेवारी रात्रौ 12 वा. पासून ते 25 जानेवारी रोजी रात्रौ 12 वा. पर्यंत कलम 163 प्रमाणे मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. 24 जानेवारी रोजी सकाळी 10 वा. पासून मतमोजणी होईपर्यंत 100 मीटर परिसरातील खाजगी आस्थापने बंद ठेवण्यात यावीत तसेच या काळात 100 मी. परिसरात मिरवणूक, गर्दी करणे व घोषणा देण्यास बंदी घालण्यात आली आहे, असे आदेश कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी दिले आहेत.
कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सौ. अक्षता खटावकर यांनी 3 जानेवारी 2025 रोजी वैयक्तीक कारणास्तव नगराध्यक्ष पदाचा राजीनामा जिल्हाधिका-यांकडे सादर केला. त्यामुळे रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदाची पोट निवडणुक कार्यक्रम घोषीत केला आहे. नगरपंचायत पदाच्या निवडणूकीकरीता विशेष सभेसाठी उपविभागीय अधिकारी कुडाळ यांना पिठासीन अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीचा निकाल पिठासीन अधिका-यामार्फत 24 जानेवारी रोजी घोषित करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक कुडाळ यांनी 20 जानेवारी 2025 रोजी नगरपंचायत कुडाळ आवारात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता प्रक्रिया संहीता 2023 चे कलम 163 नुसार मनाई आदेश लागू करण्याची विनंती प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्याकडे केली होती.
24 जानेवारी रोजी नगरपंचायत कार्यालय कुडाळ यांच्या कार्यालयाच्या परिसरात 100 मीटरच्या आत विविध पक्षाचे कार्यकर्ते व इतर समाजकंटक विनाकारण जमा होऊन, विविध कारणांवरुन त्यांच्यामध्ये वादविवाद होऊन त्याअन्वये सार्वजनिक शांतता व कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या दिवशी सार्वजनिक शांतता भंग होऊन निवडणूकीच्या प्रक्रियेमध्ये बाधा निर्माण होऊ शकत असल्याने मनाई आदेश लागू करण्याची मागणी कुडाळ पोलीस निरीक्षक यांनी केली होती. या अनुषंगाने कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी मतमोजणीच्या कालावधीत मनाई आदेश पारीत केला आहे. यानुसार नगरपंचायत कुडाळच्या संपूर्ण कार्यक्षेत्रात 22 जानेवारी 2025 रात्रौ 12 वा.पासून ते 25 जानेवारी रोजी रात्रौ 12 वा. पर्यंत मनाई आदेश लागू केला आहे.
24 जानेवारी रोजी सकाळी 10 वा.पासून मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत नगरपंचायत कार्यालयाच्या 100 मी. परीघातील सर्व खाजगी आस्थापना बंद ठेवण्यात यावेत. मतमोजणीचे वेळेस नगरपंचायत कार्यालय कुडाळ यांचे कार्यालयाच्या परीघामध्ये शस्त्र बाळगणे व ते बरोबर घेवून फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच नगरपंचायतीच्या 100 मीटर परीघामध्ये मिरवणूक घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणने आणि मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. अशी माहिती कुडाळ पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.
मविआकडून नगरसेवकांना व्हिप
कुडाळ नगरपंचायतीतील महाविकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांना महाविकास आघाडीचे मुख्य सचेतक तथा गटनेता मंदार शिरसाट यांनी 24 जानेवारी रोजी होणार्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत आघाडीच्या उमेदवार सौ.सई देवानंद काळप यांना मतदान करावे यासाठी व्हीप बजावला आहे. तसेच नगरपंचायमधील महाविकास आघाडीचे नगरसेवक ज्योती जयेद्र जळवी, श्रुती राकेश वर्दम, श्रेया शेखर गवंडे, आफरीन अब्बास करोल, अक्षता अनंत खटावकर, सई देवानंद काळप, मंदार श्रीकृष्ण शिरसाट,उदय रामचंद्र मांजरेकर व किरण चंद्रकांत शिंदे या नववी सदस्यांना व्हिप बजावला आहे.