Published on
:
23 Jan 2025, 3:52 am
Updated on
:
23 Jan 2025, 3:52 am
नाशिक : भागीदारी पद्धतीने रस्ता बांधत टोलनाका उत्पन्नात अपहार आणि नुकसान भरपाईच्या रकमेत हेराफेरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संशयितांनी कर्जाच्या हप्त्यांमध्ये टाळाटाळ करत पैसे कंपनीच्या बँक खात्याऐवजी स्वतःच्या खात्यावर वळवत १२ कोटी ६१ लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पंकज कुमार आनंदकुमार ठाकूर (५४, रा. सांताक्रुज, मुंबई) यांच्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ठाकूर यांच्या फिर्यादीनुसार, २०१४ ते २०२२ दरम्यान संशयितांनी संगनमत करून अबान ऑफशोर लिमिटेड व त्याअंतर्गत असलेल्या एशियन टेक कंपनीला गंडा घातला. एशियन टेक कंपनीकडून सरकारी व खासगी रस्ते बांधकाम तसेच इतर व्यवसाय केले जातात. संशयित शकुर सय्यद यांच्या आय. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीस २००१-०२ दरम्यान आडगाव-निफाड-छत्रपती संभाजीनगर रस्त्याचे १६ कोटींचे बांधकाम बीओटी तत्वावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर झाले. परंतु, भांडवल अभावी, अबान कंपनीच्या उपकंपनीने ५० टक्के भागीदारीत हा प्रकल्प पूर्ण केला. यासाठी कंपनीने ११ कोटींचे कर्ज घेतले.
रस्त्याचे काम ६ मार्च २००४ रोजी पूर्ण झाल्यानंतर, टोल वसुलीची जबाबदारी संशयित शकुर सय्यदकडे होती. मात्र, त्याने टोलमधून मिळालेली रक्कम संबंधित बँक खात्यात जमा न करता, ती स्वतःच्या फायद्यासाठी वापरली. कर्ज वेळेत न फेडल्याने आय. एस. इन्फ्रास्ट्रक्चर अॅण्ड बिल्डकॉन प्रा. लि. कंपनीचे खाते बुडीत घोषित झाले. परिणामी, अबान व्हेन्चर्स फर्मला ४० लाखांचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागला.
सार्वजनिक बांधकाम विभागाने टोलचे संचालन ताब्यात घेतल्यानंतर, कंपनीने नुकसानभरपाईसाठी आर्बिट्रेशनमध्ये दावा केला, जो कंपनीच्या बाजूने निकाली लागला. मात्र संशयितांनी अबान ग्रुपला विश्वासात न घेता १२.६१ कोटी रक्कम इमोर्टल कंपनीच्या खात्यावर बेकायदेशीरपणे घेतली. या फसवणुकीबाबत संशयित शकुर अहमद जमालुद्दीन सय्यद (पवननगर, सिडको, मुळ रा. राजस्थान), संदिप रवींद्र भाटिया, करण सिंग, जोजी थॉमस, आणि इमोर्टल कंपनीचे संचालक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनावट कागदपत्रांद्वारे गंडा
संशयितांनी संगनमत करून बनावट स्वाक्षऱ्या, कागदपत्रे तयार करून स्वत:ला कंपनीचे चेअरमन, संचालक असल्याचे भासवले. तसेच कंपनीच्या बँक खात्यातून पैसे काढून विश्वासघात केला. तर संशयित जोजी थॉमसने त्याची जबाबदारी पार न पाडता संशयितांना मदत करीत न्यायालयीन कामकाज अबान कंपनीस कळवले नाही.