बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर बुधवारी (22 जानेवारी) ‘छावा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका आहेत. रश्मिकाच्या करिअरमधील हा पहिलाच ऐतिहासिक कथानकावर आधारित असलेला चित्रपट असून यामध्ये ती महाराणी येसुबाई भोसलेंच्या भूमिकेत आहे. तर अभिनेता विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. ट्रेलरमधील विकी आणि रश्मिकाच्या भूमिका पाहून प्रेक्षक भारावले आहेत. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. अशातच ट्रेलर लाँचदरम्यान रश्मिकाने तिच्या करिअरविषयी असं काही वक्तव्य केलंय, ज्याची सध्या जोरदार चर्चा होता आहे. “आता मी खुशाल निवृत्त होऊ शकते” असं ती म्हणाली. त्यामुळे करिअरच्या शिखरावर असताना अवघ्या 28 व्या वर्षी रश्मिका अभिनयातून रिटायर होणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
22 जानेवारी रोजी मुंबईतील प्लाझा थिएटरमध्ये ‘छावा’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला. यावेळी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यासह चित्रपटातील कलाकारसुद्धा उपस्थित होते. या ट्रेलर लाँचदरम्यान रश्मिकाने तिला मिळालेल्या या अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी दिग्दर्शकांचे आभार मानले. इतक्या मोठ्या भूमिकेनंतर आता मी खुशाल निवृत्त होऊ शकते, असंही की मस्करीत म्हणाली. “माझ्यासाठी ही अत्यंत आदराची बाब आहे. दक्षिणेतून आलेल्या मुलीला महाराणी येसुबाई भोसलेंची भूमिका साकारायला मिळणं ही खूप मोठी आणि खास गोष्ट आहे. यापेक्षा आयुष्यात मला आणखी काहीच नको. मी लक्ष्मण सरांनाही सांगितलं की ‘छावा’मधील या भूमिकेनंतर मी आनंदाने रिटायर होऊ शकते. मी पटकन रडणारी नाही पण हा ट्रेलर पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं. विकी यामध्ये देवाप्रमाणेच दिसतोय”, अशा शब्दांत रश्मिकाने भावना व्यक्त केल्या.
हे सुद्धा वाचा
येसुबाईंच्या भूमिकेविषयी ती पुढे म्हणाली, “मला लक्ष्मण सरांनी जेव्हा महाराणी येसुबाईंच्या भूमिकेची ऑफर दिली, तेव्हा मी थक्कच झाले होते. मी स्वत:ला या भूमिकेत पूर्णपणे समर्पण केलंय. तुमच्याकडे संदर्भ नाहीत. ती एक कथा आहे आणि तुम्हाला त्यांची कहाणी माहीत आहे. त्यांचं व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रभावी आहेत. अशी व्यक्तीरेखा तुम्ही कशी साकारणार? या भूमिकेसाठी मी दिग्दर्शकांवर पूर्णपणे विश्वास ठेवला. भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी मला प्रचंड मेहनत करावी लागली. आम्ही खूप सराव केला.”