लातूर (Latur):- राज्यातील सर्वच साखर कारखान्यांनी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे. राज्यात लातूरच्या मांजरा साखर कारखान्याने (Sugar Factories) १०० टक्के हार्वेस्टरद्वारे ऊस तोड केली आहे. मांजरा साखर कारखान्याचे याबद्दल कौतुकच आहे, असे सांगत ‘त्यांना जमलं, मग तुम्हाला जमत नाही?’ असा सवाल करीत येणाऱ्या काळात मांजरा साखर कारखान्याचा हार्वेस्टर ऊस तोडणी पॅटर्न आपण सगळ्यांनी राबवावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी केले कौतुक
मांजरी पुणे येथे गुरुवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या 48 व्या व वार्षिक सर्वसाधारण सभेत राज्यातील सहकारी व खाजगी साखर कारखान्यांना सन 2023-24 या गाळप हंगामासाठी सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना, सर्वोत्कृष्ट उद्योजगता पुरस्कार, सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अर्थिक व्यवस्थपन पुरस्कार, सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षता पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री व व्हीएसआयचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, माजी मंत्री आमदार जयंत पाटील, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार विशाल पाटील, साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पांडुरंग पाटील, साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, वसंतदादा शुगर इन्स्टीटयुटचे महासंचालक संभाजी कडु पाटील, सल्लगार शिवाजीराव देशमुख तसेच साखर उद्योगातील अनेक मान्यवर उपस्थित होते.