”जखमी वाघ काय असतो व त्याचा पंजा काय करतो ते तुम्हाला भविष्यात दिसेल. त्यामुळे मराठी माणसाच्या नादी लागू नका. जिथे औरंजेबाला झुकवलं तिथे अमित शहा किस झाड की पत्ती आहे, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फटकारले आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेनेचा विराट मेळावा अंधेरी येथे पार पडला. या मेळाव्यात भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी भाजप, नरेंद्र मोदी, अमित शहा व गद्दार मिंध्यांना फटकारले आहे.
”अमित शहा तुम्ही माझी जागा ठरवू शकत नाही. माझी जागा ही माझी शिवसेनाप्रमुखांनी दिलेली ही अस्सल वडिलोपार्जित संपत्ती आहे. शिवसेना प्रमुख म्हणायचे जो पर्यंत शिवसैनिक आहेत तोपर्यंत मी शिवसेनाप्रमुख आहे. तसंच मी सांगतो जोपर्यंत शिवसैनिक आहेत तोपर्यंत मी शिवसेना पक्षप्रमुख आहे. गद्दारांनी वार केले तरी हा उद्धव ठाकरे संपणार नाही. गद्दारांना गाडूनच मी संपेन. ज्या दिवशी माझा एक जरी निष्ठावंत शिवसैनिक बोलला तू बाळासाहेबांचे विचार सोडले बाजूला हो. त्या क्षणी जसं मी मुख्यमंत्रीपद सोडलं तसं हे पक्षप्रमुख पद सोडल्याशिवाय राहणार नाही. पण मला खात्री आहे संपूर्ण महाराष्ट्र मला त्यांचा कुटुंबप्रमुख मानतो. तो महाराष्ट्र माझ्याशी इतका निष्ठूरपणे वागू शकत नाही. हार जित असू शकतो. जसा पराभव आम्हाला धक्का देणारा होता. तसा भाजपच्या अनेक लोकांना हा विजय धक्कादायक होता. आपण जिंकलो कसे असा प्रश्न अनेकांना होता. ज्या अमित शहांनी सरकारी यंत्रणा वापरून आपल्या महाराष्ट्रावर घटनाबाह्य सरकार लादलं ते असा तसा महाराष्ट्र आपल्या हातून सुटू देतील. महाराष्ट्राने मोदींच्या अश्वमेधाचं गाढव ज्या लोकसभेत प्रकारे अडवलं तो फटका अजूनही वर्मी घाव बसलाय त्यातून ते उठत नाहीए. ज्या क्षणी महाराष्ट्र आपल्या हातून जाईल तेव्हा दिल्ली कोलमडणार आहे. जर महाराष्ट्राचा निकाल सर्व जनतेच्या मनासारखा लागला असता तर आज दिल्लीचं सरकार कोलमडलेलं दि्सलं असतं ही महाराष्ट्राची ताकद आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.