नारायणगाव बसस्थानकpudhari
Published on
:
23 Jan 2025, 1:15 pm
Updated on
:
23 Jan 2025, 1:15 pm
नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : नारायणगाव बसस्थानकासमोरील हॉटेलच्या बाहेर वाहने लावली जात असल्याने अपघाताची भीती व्यक्त होत आहे. पोलिसांनी यावर उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
नाशिक महामार्गावर मुक्ताई धाब्याजवळ रस्त्याच्या कडेला बंद पडलेल्या एसटी बसवर प्रवासी वाहतूक करणारे वाहन व टेम्पो आदळल्याने भीषण अपघात होऊन नऊ जणांचा बळी गेला. त्यामुळे पोलिस अलर्ट मोडवर आहेत. रस्त्याच्या कडेला वाहतुकीला अडथळा होणार नाही, याबाबत दक्षता घेतली जात आहे.
नारायणगाव बसस्थानकासमोर असलेल्या हॉटेलच्या पुढे रस्त्याला खेटून वाहने उभी केली जातात. त्यातच बसस्थानकाचे काम चालू आहे. बस आत येण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी एकच मार्ग असल्याने या ठिकाणी अपघाताची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने रस्त्याच्या कडेला कोणीही वाहने लावू नयेत, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आली आहेत. बॅरिकेड्सच्या बाहेर वाहन लावणाऱ्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिला आहे.
शेलार म्हणाले की, बसस्थानकाच्या समोर दुचाकी वाहने मोठ्या संख्येने लावली जातात. पोलिस वारंवार सांगून देखील कोणी दखल घेत नाही. यापुढे रस्त्यावर जर कोणी वाहन लावले आणि वाहतुकीला अडथळा होत असल्याचे निदर्शनास आले, तर त्या वाहनावर दंडात्मक कारवाई करून वाहन जप्त केले जाईल.
नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे म्हणाले की, मुक्ताई मंगल कार्यालयाच्या समोर मोकळी जागा असून, त्या ठिकाणी वाहनतळ केले जाईल. नारायणगाव शहरामध्ये येणाऱ्यांनी वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने बसस्थानकासमोर वाहने लावू नयेत.