Published on
:
23 Jan 2025, 1:13 pm
Updated on
:
23 Jan 2025, 1:13 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2025 च्या हंगामापूर्वी गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाला मोठा धक्का बसला आहे. केकेआरचा सर्वात महागडा खेळाडू व्यंकटेश अय्यर रणजी ट्रॉफी सामन्यादरम्यान जखमी झाला आहे. तो सध्या मध्य प्रदेशकडून खेळत असून केरळविरुद्धच्या सामन्यात त्याच्या घोट्याला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, तो अगामी आयपीएल स्पर्धा लक्षात घेता रणजी ट्रॉफीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
तिरुअनंतपुरममधील सेंट झेवियर्स कॉलेज ग्राउंडवर सुरू असलेल्या केरळ विरुद्धच्या सामन्यात मध्य प्रदेश संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. मध्य प्रदेशची सुरुवात खूपच खराब झाली. त्यांनी त्यांच्या 4 विकेट्स 17.2 षटकांत 49 धावांवर गमावल्या. अशा परिस्थितीत व्यंकटेश अय्यर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली. त्याने डावात फक्त 3 चेंडू खेळले होते, पण नंतर फलंदाजी करताना त्याचा घोटा मुरगळला. अय्यर वेदनेने ओरडत जमिनीवर पडला. मैदानात फिजिओलाही बोलावण्यात आले. काही वेळाने, इतरांच्या आधाराने, तो मैदानाबाहेर गेला. त्याला रिटायर्ड हर्ट घोषित करण्यात आले. यानंतर तो मैदानात परतला आणि लंगडत फलंदाजी करत 42 धावांची खेळी खेळला.
मध्य प्रदेशने पहिल्या डावात 160 धावा
अय्यरच्या खेळीच्या मदतीने मध्य प्रदेशने पहिल्या डावात सर्व विकेट गमावून 160 धावा केल्या. अय्यरपेक्षा जास्त धावा कर्णधार शुभम शर्माने केल्या. त्याने 54 धावा फटकावल्या. केरळच्या उत्कृष्ट गोलंदाजीसमोर मध्य प्रदेशच्या बहुतेक फलंदाजांनी निराशा केली आणि संघ 60.2 षटकांतच सर्वबाद झाला. केरळकडून उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज निधीशने सर्वाधिक 5 बळी घेतले.
दरम्यान अय्यर डगआउटमध्ये दुखापतग्रस्त पाय खुर्चीवर ठेवून बसलेला दिसला. कोलकाता नाईट रायडर्ससाठी हा मोठा धक्का आहे. केकेआरने त्याला 23.75 कोटी रुपयांना खरेदी केले होते. अय्यरने आयपीएल 2024 मध्ये केकेआरकडून खेळताना 13 डावांमध्ये 46.25 च्या प्रभावी सरासरीने 370 धावा केल्या होत्या. त्याने 158 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आणि हंगामात एकूण चार अर्धशतके फटकावली होती.
अय्यरच्या दुखापतीची तीव्रता अद्याप निश्चित झालेली नाही. मात्र आयपीएल 2025 च्या हंगामापूर्वी केकेआर चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
अय्यर KKRचा कर्णधार होण्याचा दावेदार
अय्यर केकेआरचा पुढचा कर्णधार होण्याच्या शर्यतीत आहे. त्याने आतापर्यंत त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 51 सामन्यांमध्ये 31.57 च्या सरासरीने आणि 137.12 च्या स्ट्राईक रेटने 1,327 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 11 अर्धशतके आणि 1 शतक आहे. 104 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने 121 चौकार आणि 61 षटकारही मारले आहेत.