गोंदिया (Gondia):- राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत ० ते १८ वर्ष वयोगटातील मुलांची तपासणी करुन मुलांमध्ये आढळणार्या जन्मत असलेले व्यंग, लहान मुलांमधील आजार, जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार व अपंगत्व इत्यादी बाबींचे वेळेवर निदान करुन त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यानुसार २१ राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम पथक कार्यरत करण्यात आले. या पथकाच्या माध्यमातून जिल्ह्यातील भरातील १९०२ अंगणवाड्यांतील ९७९४२ बालकांची तपासणी करण्यात आली.
१४०८ शाळेतील १,५५,३७८ विद्यार्थ्यांची तपासणी
गोंदिया जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालय अंतर्गत तब्बल २१ राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम पथक कार्यरत असुन जिल्ह्यातील ० ते १८ वर्ष वयोगटातील जवळपास १,५५,३७८ मुलांची तपासणी करण्यात आली आहे.अंगणवाडीस्तरावर ० ते ६ वर्ष वयोगटातील मुलांची वर्षातून २ वेळेस होणारी आरोग्य तपासणी हा हया कार्यक्रमाचा अत्यंत महत्वाचा घटक असुन जवळपास ९७९४२ बालकांची तपासणी करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत एकूण २१ पथके मंजुर करण्यात आलेली आहेत. प्रत्येक पथकात १ वाहन,१ वैद्यकीय अधिकारी स्त्री व १ वैद्यकीय अधिकारी पुरुष ,१ औषधी निर्माण अधिकारी, १ एएनएम,तपासणी साहित्य, इत्यादी पुरविण्यात आलेले आहे.
२१ आरबीएसके पथक कार्यरत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाची पथके प्रत्येक तालुक्यात नियुक्त करण्यात आलेली आहेत.सदर पथकाचे मुख्यालय ग्रामीण रुग्णालये किंवा संबंधित उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय हे आहे. आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे शाळा व अंगणवाडीनिहाय वेळापत्रक शिक्षण आणि महिला व बाल कल्याण विभागांच्या समन्वयाने तयार करुन प्रत्येक पथकास ठराविक वेळापत्रकाप्रमाणे तपासणी करण्याचे निर्देश देण्यात येत असते. सदरची आरोग्य तपासणी पथकांकडून शाळा व अंगणवाडींना भेटी देवून तेथील बालकांची डोक्यापासुन पायाच्या अंगठापर्यंत तपासणी करण्यात येते. सदर आरोग्य तपासणी दरम्यान मुलांमध्ये आढळून आलेल्या आरोग्य विषयक समस्या/ अडचणीसाठी योग्य ते संदर्भ सेवा तसेच वैद्यकिय व शल्य चिकित्सक उपचार दिला जातो.