AI शाप की वरदान?

6 hours ago 2

>> डॉ. बाळ फोंडके

‘नैसर्गिक बुद्धिमत्ता’ ते ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ हा माणसाचा प्रवास अचंबित करणारा आणि त्याच्या बुद्धीचे अचाट सामर्थ्य दाखविणारा आहे. मात्र त्याच वेळी ‘एआय’ नावाचे ‘दुधारी शस्त्र’ लाभदायक ठरताना माणसासाठी ‘भस्मासुर’ तर ठरणार नाही ना? त्याला नियंत्रित आणि नियमित करता येईल का? असे अनेक प्रश्नही आहेत. त्यांची उत्तरे शोधणारा, ‘एआय’चे धोके, त्यावरील उपाय आणि फायदे- तोटे यावर प्रकाश टाकणारा ‘एआय क्रांती’ हा खास विशेषांक… शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आणि दै. ‘सामना’चा 36 वा वर्धापन दिन यानिमित्ताने…

निसर्गाने मानवाला बहाल केलेल्या बुद्धिमत्तेचे सात प्रकार हॉवर्ड गार्डनरनं सांगितलेले आहेत. त्यातल्या गणिती आणि भाषाविषयक या दोनब प्रकारांचा वापर तुमच्या- आमच्यासारखी बहुसंख्य मंडळी करत असतात. आपल्या दैनंदिन व्यवहारांमध्ये गणिताचा वापर करावा लागतो. पण तो बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, या प्राथमिक स्वरूपाच्या प्रक्रियांपुरताच मर्यादित असतो. पण जसजशी या व्यवहारांची व्याप्ती बाढत गेली, तसतसा अधिक जटिल गणिताचा सामना करावा लागणं अपरिहार्य होऊन बसले. ते साध्य करण्यासाठी संगणकाचा जन्म झाला. सुरुवातीला फक्त वैज्ञानिकादी संशोधकच त्याचा वापर करत होते. पण वैयक्तिक संगणक, पर्सनल कॉम्प्युटर, अस्तित्वात आल्यानंतर त्याचा अधिक प्रसार झाला.

तरीही संगणकाची भाषा केवळ शून्य आणि एक या दोन मूळाक्षरांची बनलेली असल्यामुळे इतर साऱ्या संख्या आणि गणिती प्रक्रिया यांचा उपयोग करण्यासाठी त्या सांकेतिक भाषेत, संगणकाला समजेल अशा मशीन लँग्वेजमध्ये रूपांतरित करण्यास सुरुवात झाली. त्याचीच पुढची पायरी म्हणून मग संगणकाशी अर्थपूर्ण संवाद साधण्यासाठी माणसाच्या भाषेचं संगणकीय भाषेत आणि उलट त्याच्या भाषेचं आपल्याला समजेल अशा भाषेत रूपांतर करणाऱ्या प्रणालींचा उदय झाला. त्यातूनच मग भाषाविषयक बुद्धिमत्तेचंही वरदान संगणकाला दिलं गेलं. तिचा वापर करत कोणत्याही विषयासंबंधीचे शेकडो, हजारो संदर्भ शोधून काढून ते आपल्यापुढं सादर करण्याची करामत संगणक लीलया पार पाडतो. त्यापायी माणूस भारवेत्ता होतो हे खरं. पण सारवेत्ता होण्यासाठी त्याला अजूनही आपल्या नैसर्गिक बुद्धिमत्तेपैकी एकीचा किंवा एकाहून अधिकाचा वापर करणं अनिवार्य असतं.

शिवाय त्या दोन प्रकारांपलीकडे चित्रकलेसाठीची त्रिमिती बुद्धिमत्ता, खेळासाठीची शारीरिक बुद्धिमत्ता, सांगीतिक बुद्धिमत्ता, समाजाचं प्रबोधन किंवा नेतृत्व करण्यासाठी आवश्यक असणारी परसंवादी बुद्धिमत्ता आणि उच्च कोटीचं मनन, चिंतन करण्यासाठीची आत्मसंवादी बुद्धिमत्ता असे एकूण सात प्रकार आहेत. उपलब्ध माहितीच्या ढिगाऱ्यातल्या घटकांच्या परस्पर संबंधांचा विचार करत त्यातील नेमक्या रचनाबंधांचा वेध घेतल्याशिवाय काही निष्कर्ष काढणं किंवा निर्णय घेणं शक्य होत नाही. त्यासाठी सातापैकी कोणत्याही एका किंवा अधिक बुद्धिमत्तांचा वापर केला जात असला तरी हीच प्रक्रिया अवलंबावी लागते, हे पॅटर्न रेकग्निशनचं कौशल्य संगणकाच्या ठायी कालपरवा पर्यंत नव्हतं. पण तेच त्याच्या अंगी रुजवत त्याच्या उपयुक्ततेत मौलिक मूल्यवृद्धी करण्याच्या उद्देशानं, जिचं आज कृत्रिम बुद्धिमत्ता असं बारसं केलं गेलं आहे, त्या ‘एआय’च्या तंत्रज्ञानाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘चॅट जीपीटी’ किंवा ‘जेमिनी’ यासारख्या माध्यमांमधून ते तुमच्याआमच्या हातातही आलं आहे. जर एआय तंत्रज्ञान सर्वच क्षेत्रात घुसखोरी करू लागलं तर ते हळूहळू जित्याजागत्या माणसांची जागा घेऊन त्यांना बेकार करेल की काय, अशी भीती वाटू लागली आहे. आधीच बेरोजगारीची समस्या उग्र असताना एआयला असं मोकाट सोडल्यास समाज ढवळून निघेल, बंड करायला उद्युक्त होईल, अशी भीती काही समाजधुरिणांना वाटू लागली आहे.

तिचं एक निराकरण सलमान रश्दींनी केलं आहे. चॅट जीपीटीला हाती धरून केलेल्या लेखनाची समीक्षा करताना त्यांनी त्यात मौलिकतेचा, सर्जनशील नवनिर्मितीचा अभाव असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. कोणत्याही अभिजात लेखनात लेखकाचं व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित झालेलं असतं. कारण अशा सर्जनशील नवनिर्मितीसाठी गार्डनरच्या सात बुद्धिमत्तांना भावनिक बुद्धिमत्तेची जोड दिली जाते. माणसाची वर्तणूक नेहमीच तर्कसंगत नसते. प्रत्येक मानवी आविष्कारात मेंदूबरोबरच मनाचाही सिंहाचा वाटा असतो. कृत्रिम बुद्धिमत्तेची निर्मिती करणाऱ्यांनी मानवी मेंदूच्या काम करण्याच्या पद्धतीची नक्कल करण्यावरच भर दिला आहे. त्यात अचपळ मनालाही सामील करून घेतलेलं नसल्याने कृत्रिम बुद्धिमत्तेची झेप कुंपणापलीकडे जात नसल्याची कारणमीमांसा काही तज्ज्ञांनी केली आहे.

माणसाच्या अंगी केवळ हुशारी असून भागत नाही. तिच्या बरोबर शहाणपण आलेले नसेल तर ती व्यक्ती नित्याच्या चाकोरीतच फिरत राहते. तशा प्रकारची चाकोरीबद्ध परिपाठातली कामं करण्यासाठी ‘एआय’चा वापर निश्चितच फायदेशीर ठरू शकेल. पण ज्या आविष्कारांमध्ये व्यक्तीला अंगभूत हुशारीचा वापर शहाणपणानं करण्याची आवश्यकता असते, तिथं कृत्रिम बुद्धिमत्ता तिच्या आजच्या स्वरूपात तरी तोकडीच पडेल, असंच तिला जन्म देणाऱ्या बिल गेट्स, इलॉन मस्क आणि जेफ्री हिन्टन यासारख्या तज्ज्ञांचं मत आहे. माणसाची जागा घेण्यासाठी एआयकडे शहाणपण असायला हवे असाच त्यांचा आग्रह आहे. ते जोवर येत नाही तोवर तरी एआयला वेसण घालणं आवश्यक आहे, असंच या धुरिणांचं मत आहे. मस्क आणि हिन्टन तर सरसकट बंदीचीच शिफारस करत आहेत. गेट्स मात्र तसा टोकाचा विचार करण्याऐवजी त्याचं नियमन करणारी यंत्रणा उभी करण्याचाच सल्ला देत आहेत.

(लेखक ज्येष्ठ विज्ञान साहित्यिक आणि विज्ञान प्रसारक आहेत.)

• जीपीएस जसा रस्त्यावरचा आपला प्रवास सुरळीत होण्यासाठी मदत करतं त्याच प्रकारे आयुष्याचा प्रवास बिनधोक व्हावा यासाठी ‘एआय’ प्रयत्न करत राहतं. ‘गुगल’वरून जसं आपण आपल्या शंकांचं निरसन करून घेण्याचा प्रयत्न करतो तसंच ते काम जीपीटी आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या समस्यांसाठी करू पाहतं. तुम्हाला एखाद्या विषयावर लेख लिहायचा आहे? जीपीटीला मदतीला घ्या. एकतर ते तुम्हाला नेमके संदर्भ पुरवेल किंवा त्याही पलीकडे जाऊन ते तुमच्यासाठी तो लेखच लिहून काढेल आणि त्याला तुमच्या यापूर्वीच्या लेखांचे संदर्भ दिलेत तर तुमच्या शैलीतच तो उतरेल याची काळजी घेईल.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article