Published on
:
23 Jan 2025, 3:46 am
Updated on
:
23 Jan 2025, 3:46 am
दोन आठवड्यांपूर्वी विमाननगर परिसरात सर्व समाजालाच विचार करण्यास भाग पाडणारी ही घटना घडली आहे. ही केवळ एक घटना नाही तर समाजमन किती मुर्दाड बनले आहे, त्याचे हे द्योतक आहे. शुभदा कोदारे (वय 28) या तरुणीचा तिचाच सहकारी मित्र कृष्णा कनोजा (30) याने शेकडो लोकांच्या डोळ्यादेखत भरचौकात चॉपरने वार करून खून केला. मात्र त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या गर्दीतील एकही ‘माई का लाल’ तिला वाचवायला पुढे आला नाही.
विमाननगर येथील डब्लूएनएस कंपनीत कृष्णा हा लिपिक पदावर, तर शुभदा एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करायची. शुभदा मूळची चिपळूणची, तिचे वडील व्यवसायच्या निमित्ताने कराड येथे स्थायिक झाले आहेत. तर ती नोकरीमुळे पाच वर्षांपासून पुण्यात राहात होती. 2022 मध्ये शुभदा आणि कृष्णा या दोघांचा एकत्र काम करत असताना परिचय झाला. दोघांत मैत्री निर्माण झाली. कृष्णाच्या म्हणण्यानुसार, शुभदा हिने वडील आजारी असल्याचे सांगून त्यांच्या तातडीच्या उपचारांसाठी त्याच्याकडून शुभदाने वेळोवेळी चार लाख रुपये घेतले. मात्र, दिवसेंदिवस तिची पैशांची मागणी वाढत चालली होती. त्यामुळे कृष्णा याला संशय आला आणि त्याने या प्रकरणाची शहानिशा करायचा निर्णय घेतला. त्यानुसार कृष्णा याने मागील अडीच-तीन महिन्यांपूर्वी शुभदा हिचे कराड येथील घर गाठले. सुभदाच्या वडिलांची भेट घेतली. त्यावेळी शुभदा हिने आपल्याकडून घेतलेले पैसे वडिलांच्या वैद्यकीय उपचारांसाठी वापरले नसल्याचे त्याला समजले. कृष्णाचीही परिस्थिती जेमतेमच आहे. आपण कष्टाने कमावलेले पैसे तिने खोटे बोलून आपल्याकडून घेतले, हे त्याच्या डोक्यात बसले होते. शुभदाचे खोटे बोलणे त्याच्या जिव्हारी लागले. त्यातूनच कृष्णा याने शुभदाला धडा शिकविण्याचे मनाशी ठरवले.
कृष्णाला शुभदाची कामावर जाण्याची आणि येण्याची वेळ माहिती होती. शुभदाने आपल्याशी खोटे बोलून पैसे घेतले म्हणून कृष्णाच्या डोक्यात सैतान संचारला होता. शुभदाची त्या दिवशी साडेसहा वाजता ड्युटी सुरू होणार होती. त्यामुळे सहा वाजता ती बसने आली होती. अर्धा तास ड्युटीला उशीर असल्यामुळे ती एका मैत्रिणीसोबत कॉल सेंटरच्या पार्किंगमध्ये थांबली होती. कृष्णाने तिला बसमधून उतरताना पाहिले होते. दोघांची नजरेला नजर मिळत एकमेकांकडे पाहून हसले. मात्र, कृष्णाच्या डोक्यात वेगळाच डाव थैमान घालत होता. त्याने शुभदा जवळ येताच ‘माझ्या पैशाचे तू काय केलेस’, असा सवाल विचारत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही कळण्याच्या आत त्याने चॉपर काढून शुभदा हिच्या उजव्या हातावर, कोपरावर चार ते पाच वार करून गंभीर जखमी केले. कृष्णा जेव्हा शुभदा हिच्यावर वार करत होता तेव्हा कोणी तिच्या मदतीला धावले नाही. शुभदाला शुगरचा आजार होता.त्यामुळे मोठा रक्तस्राव झाला. जागीच शुभदा बेशुद्ध पडली होती. काही वेळाने कृष्णा याने हातातील चॉपर खाली टाकून दिला. त्यावेळी पन्नास ते साठ जणांच्या जमावातील काही लोकांनी धाव घेत कृष्णाला चोप दिला. मात्र हेच धाडस त्यांनी काही वेळापूर्वी अगोदर दाखवले असते तर कदाचित शुभदाचे प्राण वाचले असते.
खरं तर शुभदाला मदत मिळाली असती तर ती आज वाचली असती. तिचा जीव जाईपर्यंत केवळ बघ्यांच्या भूमिकेत असलेल्या नागरिकांमध्ये काही जाणीव शिल्लक राहिली की नाही? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. कॉलसेंटरच्या मॅनेजरला हा प्रकार समजल्यानंतर तो खाली आला. त्यानंतर त्याने शुभदा हिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तो खाली येईपर्यंत दहा मिनिटे शुभदा मदतीसाठी वाट पाहात होती. तिला शुगरचा आजार असल्यामुळे मोठा रक्तस्राव झाला. त्यामुळे ती जागेवरच कोसळल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येते आहे.