जळगाव येथे काल भीषण रेल्वे अपघात झाला. पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली. त्यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अपघातासंदर्भात पत्रकारांना माहिती दिली आहे. “ही घटना दुर्देवी आहे. परंतु तिथे माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की, उदल कुमार हा 30 वर्षांचा उत्तर प्रदेशातील श्रीवस्ती जिल्ह्यात राहणारा युवक पुष्पक एक्सप्रेसने 21 जानेवारीला 9.25 ला लखनऊवरुन मुंबईला येण्यासाठी निघाला होता. त्याच्यासोबत पत्नीचा भाऊ विजय कुमार होता. दोघे पहिल्यांदाच रोजगार मिळवण्यासाठी मुंबईत येत होते” असं अजित पवार यांनी सांगितलं.
“सर्वसाधारण तिकीटावर ते प्रवास करत होते. सर्वसाधारण बोगीच्या वरच्या आसनावर ते बसले होते. रेल्वे रसोई यान बोगीतील चाह विक्रेत्याने आग लागली, आग लागली अशी ओरड केली. त्या ओराळ्या उदल आणि विजय दोघांना ऐकू आल्या. ते ऐकू आल्यानंतर बोगीमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यावेळी काही प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी ट्रेनमधून दोन्ही बाजूंना उड्या मारल्या. पण गाडीचा वेग होता. इतर प्रवासी खाली उतरु शकत नव्हते” असं अजित पवार म्हणाले.
स्वत:च डोक चालवून साखळी खेचली
“त्याचवेळी एका प्रवाशाने स्वत:च डोक चालवून साखळी खेचली. त्यामुळे ट्रेन थांबली. प्रवासी मिळेल तिथून खाली उतरु लागले. त्याचवेळी बंगळुरु-नवी दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस वेगात आली. त्यावेळी रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना धडक दिली. त्याच बरेच प्रवासी मृत्यूमुखी पडले. काही जखमी झाले. उदल कुमार आणि विजय कुमार हे सुद्धा जखमी आहेत” अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
अफवेमुळे ही रेल्वे दुर्घटना
“13 प्रवाशांचा या रेल्वे दुर्घटनेत मृत्यू झाला. 10 प्रवाशांची ओळख पटली आहे. 3 प्रवाशांची ओळख अजून पटलेली नाही. अफवेमुळे ही रेल्वे दुर्घटना झाली. जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत” अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
नितेश राणेंसंदर्भात काय म्हणाले?
सैफ अली खानच्या हल्ल्यावर मंत्री नितेश राणे यांनी शंका व्यक्त केली. त्यावर पत्रकारांनी विचारलं असता अजित पवार म्हणाले की, “पोलिसांनी या संदर्भात सर्व माहिती दिली आहे. हल्ल्याबाबत कोणाला काही शंका असल्यास त्यांनी पोलिसांना सांगावं”