ह्युमनाइड उद्याचा माणूस

6 hours ago 1

<<< डॉ. माधवी ठाकूर देसाई >>>

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात महान गणितज्ञ अ‍ॅलन ट्युरिंग यांनी “यंत्रांना विचार करता येईल का?”, असा प्रश्न विचारला आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवरच्या संशोधनाला जोमाने सुरुवात झाली. पुढे आपल्या कल्पनाशक्तीचा अभूतपूर्व विस्तार करून माणसांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती केली आणि ‘ह्युमनॉइड रोबोटिक्स’ची सुरुवात झाली. ‘ह्युमनॉइड रोबोटिक्स’ हा कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स या दोघांचा मिलाफ आहे.

माणसांची कल्पनाशक्ती हीच त्यांच्या नवनिर्मितीची प्रमुख प्रेरणा असते. अगदी हुबेहूब माणसासारखे दिसणारे आणि माणसासारखंच काम करणारे एखादे यंत्र असावं असे स्वप्न माणसांनी फार प्राचीन काळापासून बघितलेलं आहे. हे स्वप्न ‘ह्युमनॉइड’ म्हणजे मानवसदृश यंत्रमानवाच्या रूपाने अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.

माणसानं आतापर्यंत जी अनेक यंत्रे शोधली त्यापेक्षा ह्युमनॉइड हे मूलभूतपणे वेगळे यंत्र आहे. धोकादायक, कंटाळवाणी, पुनरावृत्ती असलेली, श्रमाची कामे करणारे यंत्रमानव आजही वापरात आहेत; पण ह्युमनॉइडसची रचना दैनंदिन वातावरणात, माणसांच्या बरोबरीने सुरक्षितपणे काम करण्यासाठी केली गेली आहेत.

ह्युमनॉइड्सचा वापर दैनंदिन वातावरणात माणसांच्या क्षमतांचा विस्तार करण्यासाठी केला जाईल. ह्युमनॉइडस् आपल्या गरजांशी जुळवून घेतील आणि मानवी मर्यादांवर मात करण्यासाठी आपल्याला मदत करतील.

माणसांना भावना असतात. दोन माणसं एकमेकांबरोबर काम करताना एकमेकांच्या भावना ओळखून काम करतात. भावनिकदृष्ट्या माणसांच्या अगदी जवळ जाणारे ह्युमनॉइडस् पुढच्या काही वर्षांत निर्माण होतील. हे ह्युमनॉइडस् वैद्यकीय क्षेत्रात परिचारिका किंवा आजारी लोकांना सोबत व्हावी म्हणून मोठ्या प्रमाणावर वापरले जातील, हॉटेल, सुपरमार्केट, वेअरहातसेस अशा ठिकाणी माणसांबरोबरीने काम करायला, वयस्कर माणसांना सोबत करायला, स्कुबा डायव्हिंग, पॅराग्लायडिंग अशा साहसी खेळांमध्ये मदतनीस म्हणून, कार्यालयांत स्वागत करायला अशा अनेक ठिकाणी ह्युमनॉइडस् वापरले जातील.

ह्युमनॉइडस् माणसांसारखा विचार करून आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन प्रतिक्रिया देणारे असतात. यामुळे ह्युमनॉइडस् बनवताना प्रामुख्याने पाच गोष्टींचा विचार करावा लागतो. यातली पहिली गोष्ट आहे झुमनॉइडस्ची समज किंवा आकलनशक्ती. यासाठी ह्युमनॉइडसमध्ये आजूबाजूचा परिसर नीट न्याहाळता येईल अशा प्रकारची कॉम्प्युटर व्हिजन (दृष्टी) असावी लागेल. याचप्रमाणे चव, बास, आवाज, तापमान, हालचाल यांच्यातला अतिसूक्ष्म भेदही टिपू शकतील असे प्रभावी संवेदक ह्युमनॉइडस्मध्ये असावे लागतील.

दुसरी गोष्ट म्हणजे, मानव-ह्युमनॉइड यांच्यातला परस्पर संवाद, ह्युमनॉइड्स किती प्रभावीपणे माणसांशी संवाद साधू शकतील यावरच ह्युमनॉइडस्चे बरचसे यश अवलंबून असेल. यासाठी ह्युमनॉइड्सना माणसांच्या चेहन्यावरचे हावभाव नीट वाचता यावे लागतील. याला ‘फेशियल रेकग्निशन’ म्हणतात, हे सोपे नाही, कारण आपल्यासमोरून एखादा माणूस वेगाने गेला तर आपण त्या माणसाला ओळखू शकतो. यामागे आपल्या डोळ्यांची विशिष्ट गुंतागुंतीची रचना असते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आता ही अवघड गोष्ट साध्य करता येऊ लागली आहे. आजचे ह्युमनॉइडस् माणसांच्या तुलनेत आकाराने काहीसे मोठे आणि वजनाला जड आहेत. यामुळे जे लोक त्यांच्याशी संवाद साधतील त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी लागेल.

दैनंदिन जीवनात उपयोगी पडण्यासाठी ह्युमनॉइडस्ना आसमंतात होणाऱ्या बदलांना तोंड देण्यासाठी सक्षम करावे लागेल. ही झाली तिसरी महत्त्वाची गोष्ट! यासाठी मशीन लर्निंग तंत्राचा वापर केला जातो. याचा फायदा म्हणजे हळूहळू ह्युमनॉइडस्ना दैनंदिन कामांमधला क्रम लक्षात येईल. उदाहरणार्थ जर एखाद्या पेशंटचे दात घासायचे असतील तर सुरुवातीला ह्युमनॉइडस्ना दात घासण्याच्या क्रियेमधली प्रत्येक पायरी विस्ताराने सांगावी लागेल. पण नंतर हळूहळू फक्त ‘पेशंटचे दात घास’ एवढेच सांगावं लागेल. ते काम कसे करायचे हे ह्युमनॉइडस् स्वतःचे स्वतः ठरवतील.

ह्युमनॉइडस्‌ना जिना चढ-उतर करणे, खडबडीत पृष्ठभागावरून चालणे, उम्रभा मारणे अशा गोष्टी करता येतील असे पाय द्यावे लागतील. याला ‘लेग्ड लोकोमोशन’ असे म्हटले जाते. यात ह्युमनॉइडस्ना फक्त पाय मागे पुढे करता येणं अभिप्रेत नाही. माणसं पाय वापरून अनेक क्रिया करताना जसा स्वतःचा तोल सांभाळतात तसे स्वतः चा तोल सांभाळत पायांचा वापर करणे ह्युमनॉइडस्ना शिकावे लागेल. ही चौथी गोष्ट साध्य करणे खूप कष्टाचे आहे.

पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ह्युमनॉइडस्‌ना बॉल पकडणे, भाज्या चिरणे, कॉफी ओतणे अशा साध्यासाध्या कामांबरोबरच टेलिसर्जरी करणे, चंद्रावर उतरून उत्खनन करणे अशी अतिकौशल्याची कामेही करावी लागतील. यांत्रिक दृष्टिकोनातूनही आज ह्युमनॉइडस् खूपच प्रगत झाले आहेत.

ह्युमनॉइडस्ची कार्यक्षमता माणसांपेक्षा खूप जास्त असल्यामुळे ते अनेक माणसांचं काम एका फटक्यात करतील. उदाहरणार्थ एक मानवी डॉक्टर एकावेळी एकाच रुग्णाला तपासू शकतो. पण ह्युमनॉइड डॉक्टर एका वेळेस अनेक रुग्णांबरोबर संवाद साधून त्यांना तपासू शकतो. ह्युमनॉइड डॉक्टरला मानवी मर्यादा नसल्यामुळे तो चोवीस तास उपलब्ध असू शकतो, एकंदरीतच जिथे मनुष्यबळाची कमतरता आहे तिथे ह्युमनॉइडस् एक मोठे वरदान ठरतील याबद्दल शंकाच नाही.

ह्युमनॉइडस्मु‌ळे अनेक सामाजिक आणि नैतिक प्रश्न निर्माण होऊ शकतात. ह्युमनॉइडस् कृत्रिम असल्यामुळे त्यांच्या भावना आपल्याला हव्या तशा नियंत्रित करता येऊ शकतात. त्यामुळे एखाद्या माणसाचा त्यांच्याबरोबरचा संवाद त्याला हवा तसाच होऊ शकतो. पण दोन माणसांमधल्या संवादात असं होऊ शकत नाही. त्यामुळे माणसामाणसांतला संबाद कमी होऊन, माणसं ह्युमनॉइडस्बरोबर राहणं जास्त पसंत करतील असा एक धोका संभवतो. एखादवेळेस कोणीतरी ह्युमनॉइडच्या प्रेमातच पडलं तर काय गोंधळ होईल याची कल्पनाच केलेली बरी! ह्युमनॉइडच्या भावना भडकवून त्यांना युद्ध करण्यासाठी प्रवृत्त केलं जाऊ शकतं.

ह्युमनॉइड रोबोटिक्समध्ये जसजशी प्रगती होईल तसतसं मानवी मन म्हणजे काय, माणसांमध्ये आढळणाऱ्या भावना, बुद्धी, चेतना, प्रेरणा या सगळ्यांचा उगम कसा झाला अशा अतिशय मूलभूत प्रश्नांचा नव्याने उलगडा होऊ शकेल. एका अर्थाने ह्युमनॉइड म्हणजे माणूस म्हणजे नक्की काय हे जाणून घेण्याचाच एक प्रयास आहे असे म्हणता येईल.

(लेखिका भौतिकशाखाच्या निवृत्त अध्यापिका आहेत.)

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article