घरी येऊन त्रास देत असल्याच्या कारणावरून महिलेने आणि तिच्या अल्पवयीन मुलीने अन्य चार साथीदारांच्या मदतीने एका तरुणाचा निर्घृणपणे खून केला. त्यानंतर अपघाताचा बनाव रचून त्याला महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल करून पसार झाले. दरम्यान, गुंडाविरोधी पथकाने मोठ्या शिताफीने तपास करत गुन्ह्याची उकल केली.
बालाजी ऊर्फ बाळू मंचक लांडे (28) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. रिक्षाचालक दिनेश सूर्यकांत उपादे (28, रा. आदर्शनगर, पिंपळे निलख), आदित्य शरद शिंदे (25, रा. स्वराज हाऊसिंग सोसायटी, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे. महिलेसह तिचे तीन साथीदार पसार आहेत. मारहाणीची घटना 17 जानेवारी रोजी चिखली येथील घरकुलमधील दूर्वांकुर सोसायटीमधील महिलेच्याघरी घडली.
पोलिस उपायुक्त डॉ. संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी हा मूळचा बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील दिंद्रूड या गावचा रहिवासी होता. आरोपी महिलासुद्धा त्याच्या गावाकडील आहे. बालाजी हा गेल्या तीन वर्षापासून रांजणगाव एमआयडीसीत नोकरी करत होता. महिलेची आणि त्याची ओळख असल्याने त्याचे तिच्या घरी येणे-जाणे होते; मात्र गेल्या काही दिवसांपासून तो दारू पिऊन महिलेच्या घरी येऊन तिला आणि तिच्या अल्पवयीन मुलीला त्रास देत असे.
या त्रासाला महिला वैतागली होती. त्यातून तिने बालाजीला जिवे मारण्याचा कट रचला. 17 जानेवारी रोजी बालाजी महिलेच्या घरी आला. या वेळी महिलेसह तिच्या चार साथीदारांनी बालाजी याला बेदम मारहाण केली. आरोपी उपादे याच्या रिक्षातून गंभीर जखमी अवस्थेतील बालाजीला महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. दाखल करणार्या दोघांनी आपली नावे खोटी सांगितली आणि दोघेजण पळून गेले. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच बालाजी याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. बालाजीच्या संपूर्ण अंगावर, डोक्यावर मारहाणीच्या गंभीर जखमा आढळून आल्याने पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचकली.