उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवा, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं होतं. अमित शाह यांच्या या विधानाचा समाचार घेताना उद्धव ठाकरेंनी आज भाजपची अक्षरश: पिसे काढली. भाजपचं हिंदुत्व कसं खोटं आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील प्रेमही कसं बेगडी आहे, हे उद्धव ठाकरे यांनी उदहारण देऊन दाखवून दिलं. बाळासाहेबांना अटक करण्यात येणार होती. तेव्हा राज्यात दंगल उसळू नये म्हणून तत्कालीन पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांनी फौजच पाठवली होती, असा गौप्यस्फोट करत उद्धव ठाकरे यांनी भाजपची पिसे काढली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने आज अंधेरीत शिवसैनिकांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अत्यंत कडक शब्दात भाजपचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी अमित शाह यांना सर्वाधिक टार्गेट केलं. छगन भुजबळ हे राज्याचे गृहमंत्री होते. त्यांनी बाळासाहेबांना अटक करण्याचा निर्णय घेतला. नंतर भुजबळ आणि बाळासाहेबांचे संबंध चांगले झाले. पण जेव्हा भुजबळ यांनी बाळासाहेबांना अटक करण्याचा निर्णय घेतला तेव्हा लालकृष्ण आडवाणी हे उपपंतप्रधान होते. बाळासाहेबांना अटक झाली तर महाराष्ट्र पेटेल, राज्यात दंगल उसळेल अशी स्थिती होती. ते होऊ नये म्हणून आडवाणी यांनी केंद्राचं दंगल नियंत्रक पथक आणि केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्या महाराष्ट्रात पाठवल्या. दंगल झाल्यावर बंदोबस्त करण्यासाठी हे पथक आलं. हेच तुमचं बाळासाहेबांवरील प्रेम होतं का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
तर खूप सालटी काढली जातील
काढायची झाली तर तुमची सालटी खूप काढली जातील. एवढी सालटी निघतील की गावात फिरता येणार नाही. तुम्ही आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे आमच्या अंगावर अजिबात येऊ नका. जेवढे अंगावर याल, तेवढे वळ घेऊनच दिल्लीला जावे लागेल, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला.
तेव्हा भाजपचंच सरकार होतं
काड्या लावायच्या, पेटवायचे आणि बाजूला व्हायचे, असंच भाजप आणि संघवाले करतात. बाबरीवरून वातावरण तापवले आणि बाबरी पडल्यावर आम्ही नाही केलं असं म्हणून नामानिराळे राहिले. हे तुमचं हिंदुत्व? हा तुमचा नामर्दपणा? आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढलो. तेव्हा बाळासाहेबांचा मतांचा अधिकार काढून घेतला. तेव्हा भाजपचंच सरकार होतं, असा घणाघाती हल्लाही त्यांनी चढवला.
तर तुम्ही दिसलाच नसता
एक वर्षापूर्वी आयोध्याच्या मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं. अजून त्या मंदिराचं कामच पूर्ण झालं नाही. बाबरी पडली तेव्हा शिवसैनिक नसते तर तुम्ही दिसलाच नसता. आम्ही हिंदूच आहोत. आम्ही जय श्रीराम बोलतो. तसं तुम्हाला महाराष्ट्रात जय शिवराय बोलावचं लागेल. जसं जय हिंद नंतर जय महाराष्ट्र बोलतो. तसंच जय श्रीरामनंतर जय शिवराय बोललंच पाहिजे, असंही त्यांनी ठणकावलं.