पिता-पुत्रांमध्ये झालेल्या वादात पित्याने लाकडी दांड्याने मारहाण केल्याने पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना आम्रपाली झोपडपट्टी परिसरात घडली. File Photo
Published on
:
23 Jan 2025, 3:59 am
Updated on
:
23 Jan 2025, 3:59 am
नाशिक : पिता-पुत्रांमध्ये झालेल्या वादात पित्याने लाकडी दांड्याने मारहाण केल्याने पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना आम्रपाली झोपडपट्टी परिसरात घडली. अनिल विठ्ठल गुंजाळ (२५) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसांत बापाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
नववर्षात शहरात खुनाची मालिका सुरू आहे. हिरावाडीतील सोसायटीच्या पार्किंग वादातून चेअरमनसह त्याच्या मुलांनी सदस्याचा केलेला खून, दुसऱ्या पत्नीने पतीचा केलेला खून, हिरावाडीत विवाहितेचा झालेला खून, उपनगरला दिव्यांग मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याचा केलेला खून या घटना एकापाठोपाठ उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बापाने मुलाचा खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली. मंगळवारी (दि. २१) रात्री अनिल व त्याचे वडील विठ्ठल हे दोघेही नशेत होते. दोघांचा वाद झाला. या वादात संतापाच्या भरात बापाने मुलाच्या डोक्यात लाकडाने मारले. घाव वर्मी बसल्याने अनिल आरडाओरड करू लागला. त्यामुळे शेजारच्यांनी ११२ क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. उपनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत अनिल यास रुग्णालयात दाखल केले. बुधवारी (दि. २२) सकाळी अनिलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलिसांनी संशयित विठ्ठल (५०) यास ताब्यात घेत चौकशी केली. दरम्यान, विठ्ठल व अनिल हे दोघेच राहत होते. दोघांमध्ये सातत्याने वाद होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अनिलच्या नातलगांनी फिर्याद दिली असून, बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत विठ्ठल याला अटक करण्यासह पुढील तपास पोलिस करीत होते.
उपनगर हद्दीत चार दिवसांपूर्वी आठ वर्षीय दिव्यांग बालकाचा इमारतीच्या 'डक्ट'मध्ये संशयास्पद मृतदेह आढळून आला. शवविच्छेदन अहवालात या मुलावर वारंवार अनैसर्गिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या मुलाचा मारेकरी व अत्याचार करणाऱ्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. तसेच पंचवटी हद्दीत हिरावाडीतील रहिवासी भारती माणिकराव वल्टे (५६) यांचाही गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले. मात्र, त्यांच्याही मारेकऱ्याचा अद्याप शोध लागलेला नाही.