Published on
:
23 Jan 2025, 1:27 am
Updated on
:
23 Jan 2025, 1:27 am
जत : माजी आमदार विलासराव जगताप, माजी शिक्षण सभापती तम्मनगौडा रवी-पाटील यांनी पक्षशिस्त आणि अनुशासन भंग करणारे कृत्य केल्याने त्यांना पक्षातून निलंबित करण्यात येत असल्याचे पत्र महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यालयाचे सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी बुधवारी काढले. हे पत्र समाजमाध्यमातून व्हायरल होताच, जगताप, रवी-पाटील गटात खळबळ उडाली.
विलासराव जगताप व तम्मनगौडा रवी-पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपात काम करत होते. जगताप हे भाजपच्या उमेदवारीवर जतमधून विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते, तर रवी-पाटील यांच्याकडे विधानसभा क्षेत्रप्रमुख पदाची सूत्रे होती. माजी आमदार विलासराव जगताप यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाचे अधिकृत उमेदवार संजयकाका पाटील यांना विरोध करीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यासाठी काम केले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपने जतमध्ये भूमिपुत्रास उमेदवारी न दिल्याने विरोधात भूमिका घेतली होती. तम्मनगौडा रवी-पाटील यांनी विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी केली होती. याच अनुषंगाने प्रदेश भाजपने त्यांच्यावर ही कारवाई केली आहे.
हा प्रकार हास्यास्पद ः जगताप
यासंदर्भात माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले, भाजपने सहा महिन्यानंतर केलेली कारवाई हास्यास्पद आहे. मुळात मी त्याचवेळी पक्षाचा रीतसर राजीनामा प्रदेश कार्यालयाकडे पाठवला होता. परंतु पक्षाला आता कशी जाग आली समजत नाही. हा प्रकार म्हणजे ‘बैल गेला अन्...’ असा आहे.
यापूर्वीच राजीनामा; कारवाई कशासाठी? ः रवी-पाटील
जत विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी गोपीचंद पडळकर यांना जाहीर झाल्यानंतर मी स्वतःहून 27 ऑक्टोबरला पक्षाचा राजीनामा दिला. अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. यापूर्वीच राजीनामा दिला असताना आता पक्षातून काढल्याचे पत्र कशासाठी? आमदार गोपीचंद पडळकर यांच्या दबाव आणि आग्रहाने भाजप प्रदेश कार्यालय प्रमुखांनी हे पत्र काढले असावे, असे तम्मनगौडा रवी-पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.