पवन येवले, किशोर पाटील, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : जळगावमध्ये आज सायंकाळी पुष्पक एक्सप्रेसने जाणाऱ्या प्रवाशांसोबत मोठी दुर्घटना घडली आहे. थांबलेल्या एक्सप्रेसमधून उतरलेल्या प्रवाशांना दुसऱ्या ट्रॅकवरून आलेल्या कर्नाटक एक्सप्रेसने अनेकांना उडवलं. तब्बल 40 जणांना एक्सप्रेसने उडवल्याचं सांगितलं जातं. या दुर्घटनेत एकूण 12 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरल्याने ही दुर्घटना घडल्याचं उघड झालं आहे. तसेच एका चहावाल्यानेच ही अफवा पसरवल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलीस या चहावाल्याचा आणि एक्सप्रेसची चैन खेचणाऱ्याचा शोध घेत आहेत.
जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकाच्या जवळ झालेल्या या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात 9 पुरुषांचा तर 3 महिलांचा समावेश आहे. तर अपघातातील पाच जखमींना पाचोऱ्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच चार गंभीर जखमींना वृदांवन या खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येत आहे. पाचोऱ्यातील पाचही जखमींना भेटून पोलिसांनी त्यांचा कबुलीजबाब घेतला आहे. घटना कशी घडली? नेमकं काय घडलं? याची माहिती पोलीस घेत आहेत.
या तपासातूनच चहावाल्याने एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरवल्याने ही दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. चहावाल्याने अफवा पसरवली आणि दुसऱ्या तरुणांने एक्सप्रेसची चैन खेचली. त्यामुळे एक्सप्रेसने जोरात ब्रेक मारला. त्यामुळे चाकांमधून आगीच्या मोठमोठ्या ठिणग्या उडाल्या. त्यामुळे एक्सप्रेसला आग लागल्याच्या अफवेवर प्रवाशांचा विश्वास बसला आणि त्यांनी मागचा पुढचा विचार न करता धडाधड एक्सप्रेसमधून उड्या मारल्या. या सर्व घटनेला कारणीभूत असलेल्या चहावाला आणि चैन खेचणाऱ्याचा स्थानिक आणि रेल्वे पोलीस आता शोध घेत आहेत.
मोहरम अली जखमी
पाचोऱ्यातील रुग्णालयात जखमींना ठेवण्यात आलं आहे. त्यातील मोहरम अली हे अत्यंत जखमी झाले आहेत. मोहरम अली हा लखनऊवरून मुंबईला येण्यासाठी निघाला होता. मुंबईतील गोरेगावमध्ये तो काम करतो. पण या अपघातात तोही जखमी झाला आहे. त्यामुळे त्याच्यावर पाचोऱ्यातील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. त्याच्यासोबत आणखी चारजण याच रुग्णालयात उपचार घेत आहेत. पोलिसांनी मोहरम अली आणि इतरांचा जबाब नोंदवला आहे. आम्ही चौघे निघालो होतो. डब्यात आग लागून धूर आल्याने आम्ही रेल्वेतून उड्या मारल्या. त्यामुळे आम्ही जखमी झालो, असं मोहरम अलीने सांगितलं.
कुणाचा मामा तर कुणाचा भाऊ
गावखेड्यातून लखनऊवरून आम्ही पाच ते सात मित्र कामधंद्यासाठी शहरात जात होतो. आम्ही एक्सप्रेसमध्येच होतो. आग लागल्याची अफवा पसरली आणि आम्ही उड्या मारल्या. साडेपाच वाजता ही दुर्घटना घडली, असं एका प्रवाशाने सांगितलं. या दुर्घटनेत कुणाचा मामा तर कुणाचा भाऊ दगावला आहे. आगीची अफवा उडाल्याने प्रवासी रेल्वेतून उड्या मारू लागले. तिकडून एक्सप्रेस आली आणि सर्वांना उडवलं, असंही त्याने सांगितलं.
डीएनए चाचणी होणार
या अपघातातील मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू झालं आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. तसेच मयतांची डीएनए चाचणी करून त्यांची ओळख पटवली जाणार असल्याचंही स्पष्ट केलं. दुसरीकडे रेल्वेने तातडीची मदत म्हणून मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख, गंभीर जखमींना 50 हजार, कायम अपगंत्व आलेल्यांना 2 लाख 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.