Published on
:
22 Jan 2025, 3:36 pm
Updated on
:
22 Jan 2025, 3:36 pm
किनवट : गोकुंदा येथील भारतीय स्टेट बँक शाखेच्या शेजारीच असलेले एटीएम मशीन बुधवारच्या मध्यरात्रीनंतर केव्हातरी चोरट्यांनी लंपास केले असून, त्यामध्ये सुमारे 21 लाख रुपये होते, असे सूत्रांकडून कळाले.
गोकुंद्याच्या ठाकरे चौकातील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या शेजारीच असलेल्या दोन एटीएम मशीन्स हे ‘इलेक्ट्रानिक पेमेंट सर्व्हिस प्राइव्हेट लिमिटेड’ या खाजगी एजंसीकडून संचालित केल्या जातात. बुधवारी (दि.22) मध्यरात्री 01.58 वाजता अज्ञात चोरट्यांनी दोन ‘एटीएम’ पैकी ज्यात सुमारे 21 लाख रुपयाची रोख रक्कम होती, ते अख्खे एटीएम यंत्रच पळविले आहे. एटीएम जवळील ‘सीसीटीव्ही’ रात्री बरोबर 01.58 वाजता बंद करण्यात आल्यामुळे, त्यानंतरच चोरट्यांनी डल्ला मारल्याचा अंदाज आहे.
नांदेड- किनवट महामार्गावरच असलेला ठाकरे चौकातील तो परिसरअतिशय रहदारीचा असून, मध्यरात्रीनंतरही तिथे वर्दळ चालूच असते. सतत राबता असलेल्या भागातून चक्क एटीएम मशीनच उचलून नेल्यामुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
घटनास्थळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक खंडेराव धरणे, पोलीस उपविभागीय अधिकारी रामकृष्ण मळघणे, पोलीस निरीक्षक सुनिल बिर्ला यांनी भेट देऊन निरीक्षण केले आहे. पो.नि.डी.जे.चोपडे, सिंदखेडचे सहा.पो.नि. जाधवर, फौजदार सागर झाडे, येवले या सर्वांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन तपास करीत आहेत. या प्रकरणात अतिरिक्त पोलिस अधीक्षक धरणे हे स्वतः जातीने लक्ष देत असल्याने, या अज्ञात चोरट्यांच्या मुसक्या लवकरच आवळल्या जातील अशी चर्चा आहे. संबंधित एजंसीचे अधिकृत व्यक्ती आल्यानंतरच किनवट पोलिसांमध्ये सविस्तर तक्रार दाखल केली जाणार असल्याचे समजते.