कृष्णा आंधळे याची माहिती देणाऱ्यास पोलिसांकडून बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
Published on
:
22 Jan 2025, 3:35 pm
Updated on
:
22 Jan 2025, 3:35 pm
केज : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण, हत्या आणि मकोका असे गंभीर गुन्हे दाखल असलेला आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. त्याची माहिती देणाऱ्याला पोलिसांनी बक्षीस जाहीर केले आहे.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर रोजी टोल नाक्यावरून अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील सबंधित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून यातील एक आरोपी कृष्णा शामराव आंधळे (वय ३०, रा. मैदवाडी, ता.धारुर) अजूनही पोलिसांच्या हाती लागला नाही. त्याच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
देशमुख यांच्या खून प्रकरणात कृष्णा आंधळे हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. कृष्णा आंधळे याच्या फोटोसहित पोलिसांनी पत्रक काढले असून यामध्ये कोणाला त्याच्या ठाव ठिकाण्याची माहिती किंवा संशयित आरोपी दिसून आल्यास तात्काळ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आरोपीची माहिती द्यावी. त्यांचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल व त्यांना योग्य ते बक्षिस देण्यात येईल, असे या प्रसिद्धीपत्रकात पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.