Published on
:
22 Jan 2025, 3:40 pm
Updated on
:
22 Jan 2025, 3:40 pm
नवी दिल्ली : ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानामुळे स्त्री-पुरूष लिंग गुणोत्तर लवकरच समप्रमाणात येईल, असा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला. तर या अभियानाच्या दशकपुर्तीनिमित्त आजपासून (दि. २२ जानेवारी) जागतिक महिला दिनापर्यंत (८ मार्च) देशभरात या मोहिमेच्या सर्व पैलुंबाबत जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे, अशी घोषणा महिला व बालकल्याणमंत्री अन्नपुर्णा देवी यांनी केली.
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाच्या दशकभरातील प्रगतीचा आढावा आणि भविष्यातील कामगिरीचा आढावा यावर राजधानीत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री जे. पी. नड्डांसह महिला व बालकल्याण मंत्री अन्नपुर्णा देवी, राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांच्यासह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी बेटी बचाओ बेटी पढाओ ही केवळ योजना नव्हे तर सामाजिक दृष्टीकोन बदलाचे महत्त्वाचे पाऊल असल्याचे प्रतिपादन अन्नपूर्ण देवी यांनी केले.
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाला १० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त जागतिक महिलादिनापर्यंत दीड महिना विविध उपक्रम चालणार आहेत. यामध्ये महिलांप्रती पुरुषांमध्ये संवेदनशीलता वाढविणे, स्त्रीपुरूष समानता, न्याय संहिता, बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांबाबतची जागरुकता वाढवणे, यावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक यांनी दिली.