आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. पाकिस्तानकडे या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान आहे. टीम इंडिया सुरक्षेच्या कारणामुळे सर्व सामने हे दुबईत खेळणार आहे. तर यजमान आणि इतर 6 संघ पाकिस्तानमध्येच सामने खेळणार आहेत. भारतीय क्रिकेट संघ जर्सीवर पाकिस्तान हे नाव छापणार नसल्याचं म्हटलं जात होतं. मात्र याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तान हे नाव असेल, असं म्हटलं जात आहे. मात्र बीसीसीआयकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
बीसीसीआय सचिवांची माहिती काय?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय आयसीसीच्या प्रत्येक नियमांचं पालन करणार असल्याचं नवनियुक्त सचिव देवजित सैकिया यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता टीम इंडियाच्या जर्सीवर यजमान पाकिस्तान असा उल्लेख असणार असल्याचं या निमित्ताने स्पष्ट झालं आहे.
पीसीबी अर्थात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या मुद्द्यावरुन अवघ्या काही तासांपूर्वी बीसीसीआय क्रिकेटमध्ये राजकारण आणत असल्याचा आरोप केला होता. आम्ही बीसीसीआयच्या या भूमिकेविरोधात आम्ही आयसीसीकडे तक्रार करणार असल्याचं पीसीबीने म्हटलं होतं. त्यामुळे आयसीसीच्या भूमिकेकडे साऱ्यांचं लक्ष लागून होतं. मात्र त्याआधीच बीसीसीआय टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तान असा उल्लेख करणार असल्याचं समोर आलं आहे.
नियमांनुसार, जो संघ आयसीसी स्पर्धेचं यजमानपद भूषवतो त्या देशाचं नाव इतर सहभागी संघांना आपल्या जर्सीवर छापावं लागतं. तसेच जर्सीवरील उजव्या बाजूला स्पर्धेचं नाव आणि वर्ष याचाही उल्लेख करावा लागतो. भारतात वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्ह इतर संघांनी त्यांच्या जर्सीवर भारताचं छापलं होतं.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार) , विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा.