लातूर (Latur) :- 21 मार्च 2022 रोजी बदली प्रक्रियेसाठी जिल्हा परिषद (Zilla Parishad) शिक्षण विभागात तात्पुरती प्रतिनियुक्ती झालेले शिरूर जि. प. प्राथमिक शिक्षण विभागाचे ‘कलेक्टर’ गुरुजी अखेर दैनिक ‘देशोन्नती’च्या वृत्तानंतर आपल्या मूळ पदस्थापनेच्या ठिकाणी म्हणजे हिप्पळगाव जिल्हा परिषद शाळेत अखेर मंगळवारी (दि.२१) रुजू झाले.
शिक्षकांच्या बदल्या त्यावेळी झाले की नाही?
लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील हिप्पळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक जिल्हा परिषद लातूर येथे शिक्षकांच्या बदली कामासाठी 2022 पासून कार्यरत होते. शिक्षकांच्या बदल्या त्यावेळी झाले की नाही? हा संशोधनाचा विषय असला तरी बदली झालेले पिपळगावचे शिक्षक डी.पी. शिरुरे हे मात्र लातूरच्या जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक विभागात आपला जम बसवून कायम होते. इकडे जिल्हा परिषद शाळेत अध्यापनाचे काम मात्र त्यामुळे रखडले होते. विद्यार्थ्यांना आपले गुरुजी केव्हा येणार? याची वर्षभर वाट पाहावी लागली. अखेर गुरुजी नसल्याचा बोभाटा झाल्यानंतर हिप्पळगाव जि.प. शाळा व्यवस्थापन समितीने याबाबत शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.
दैनिक ‘देशोन्नती’ने (Dainik Deshonnati)याबाबत 19 जानेवारीच्या अंकात ‘शिक्षणाधिकाऱ्यांच्या तोंडी आदेशाने ‘शिरूर’चे गुरुजी ‘कलेक्टर’, असे वृत्त दिले. या वृत्ताचा दणका बसताच अखेर प्राथमिक शिक्षण विभागाला जाग आली आणि या गुरुजींची रवानगी अखेर हिप्पळगावच्या जि. प. शाळेत करण्यात आली. त्यानुसार मंगळवारी (दि. 21) हिप्पळगाव शाळेत गुरुजी रुजू झाले आणि विद्यार्थ्यांनी सुस्कारा सोडला.