Published on
:
22 Jan 2025, 10:25 am
Updated on
:
22 Jan 2025, 10:25 am
नागपूर, पुढारी वृत्तसेवा : वाहनांवर असलेल्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करण्यासाठी 2019 पूर्वीच्या जुन्या वाहनांना अति सुरक्षा नोंदणी नंबरप्लेट (High Security Registration Plates) बसविणे आवश्यक आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देशही दिले आहेत. रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे, या नवीन अति सुरक्षा नोंदणी प्लेटमुळे सोपे झाले आहे. राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून दि. 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादीत झालेल्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना ही नंबरप्लेट बसविणे अनिवार्य असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी दिली.
प्रादेशिक परिवहन विभागातर्फे सदर नंबर प्लेट (High Security Registration Plates) बसविणाऱ्या एजन्सीची झोननिहाय अधिकृत केंद्रांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे. महाराष्ट्र मोटार वाहन विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ही यादी देण्यात आली आहे. याचबरोबर वाहनाप्रमाणे नंबरप्लेट तयार करुन ती बसविण्यासह एकत्रित खर्च वाहन प्रकारानिहाय निश्चित करुन दिला आहे. दुचाकी वाहन व ट्रॅक्टरसाठी 450 रुपये अधिक जीएसटी, तीनचाकी वाहनासाठी 500 रुपये अधिक जीएसटी व उर्वरित सर्व वाहन प्रकारासाठी 745 रुपये अधिक जीएसटी एवढा खर्च येईल.
एजन्सीकडून काही अडचणी आल्यास अथवा त्यांनी अशा नंबरप्लेट बसवून देण्यासंदर्भात कुणाच्या तक्रारी असतील. तर संबंधित सेवा पुरवठादाराच्या पोर्टलवर तक्रार दाखल करावी, असेही विजय चव्हाण यांनी सांगितले.