धनंजय मुंडेंचे मंत्रिपद नव्हे तर आमदारकीही जाणार?:अंजली दमानिया यांनी घेतली पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट
2 hours ago
2
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे मंत्रिपदच नव्हे तर आमदारकीही जाणार असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. यासाठी त्यांनी मुंडेंकडे असणाऱ्या एका कथित लाभाच्या पदाचा दाखला दिला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे मुंडे समर्थकांत मोठी खळबळ माजली आहे. अंजली दमानिया यांनी बुधवारी संतोष देशमुख हत्याकांडाप्रकरणी राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी उपरोक्त दावा केला. त्या म्हणाल्या, राज्य शासनाच्या महाजेनकोकडून धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांच्या कंपनीला एक कंत्राट देण्यात आले होते. या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी आपल्या कंपनीचा थेट फायदा करून घेतला. हे लोकप्रतिनिधींसाठी घालून देण्यात आलेल्या ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या नियमाचे स्पष्ट उल्लंघन आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद सोडा, त्यांची आमदारकीही रद्द होऊ शकते. पोलिस महासंचालकांना बीडची संपूर्ण माहिती दिली त्या पुढे म्हणाल्या, मी आज पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली. त्यांना बीडमधील परिस्थिती व दहशत या सर्वांची माहिती दिली. एवढेच नाही तर धनंजय मुंडे यांच्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस, टर्टल्स लॉजिस्टिक लिमिटेड, जगमित्र शुगर आदी कंपन्यांचा तपशीलही त्यांना दिला. या कंपन्यांमध्ये धनंजय मुंडे, राजश्री मुंडे व वाल्मीक कराड हे भागीदार आहेत. अशा कंपन्यांना सरकारी कंपनी असणारी महाजेनको कसे कंत्राट देऊ शकते? महाजेनकोकडून धनंजय मुंडे यांच्या कंपनीला थेट फायदा झाला आहे. आमदार किंवा खासदार अशा पद्धतीने आपल्या कंपनीसाठी कोणताही फायदा मिळवत असतील तर ते लाभाचे पद या नियमाचे उल्लंघन ठरते. यामु्ळे धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद सोडा त्यांचे विधानसभेचे सदस्यत्वही रद्द होऊ शकते. धनंजय मुंडेंच्या जगमित्र शुगर्स्ला 62 कोटी रुपयांचे कर्ज कोणत्या आधारावर देण्यात आले? हायकोर्टाने याविषयी एसीबी, ईडी व सीआयडीला चौकशी करण्याचे आदेश द्यावेत. मी या सर्वांचा तपशील पोलिस महासंचालकांना दिला आहे. त्यावर त्यांनीही या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. वाल्मीक कराडला न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर नाराजी अंजली दमानिया यांनी यावेळी वाल्मीक कराडला एवढ्या लवकर न्यायालयीन कोठडी मिळालीच कशी? असा सवालही उपस्थित केला. या प्रकरणी त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वाल्मीक कराडला एवढ्या लवकर न्यायालयीन कोठडी कशी मिळाली? कालच त्याचा संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांसोबतचा व्हिडिओ समोर आला होता. यामुळे त्याची आणखी चौकशी करण्याची गरज होती, असे त्या यासंबंधी म्हणाल्या. आरोपींना मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात ठेवा प्रस्तुत प्रकरणातील एक आरोपी असणाऱ्या विष्णू चाटेला लातूरच्या तुरुंगात हलवण्यात आले आहे. यावरही अंजली दमानिया यांनी यावेळी हरकत घेतली. विष्णू चाटेला चॉईस ऑफ जेल देण्यात आले आहे. त्याला लातूर जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. तिथे त्याचे जवळचे 8-10 लोक आहेत. मी त्याचीही यादी पोलिस महासंचालकांना दिली आहे. माझी मागणी आहे की, या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत हा खटला मुंबईत हलवण्यात यावे. तसेच वाल्मीक कराड व इतर आरोपींना आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात यावे. या प्रकरणी आरोपींचे पोलिसांसोबत असलेले संगनमत मोडून काढण्याची गरज आहे. अन्यथा यासंबंधी न्यायपूर्ण चौकशी होणार नाही, असे दमानिया म्हणाल्या.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)