गर्द सावलीचा गगनबावडा - कोल्हापूर रस्ता झाडे तोडल्याने ओसाड झाला आहे. Pudhari Photo
Published on
:
22 Jan 2025, 8:29 am
Updated on
:
22 Jan 2025, 8:29 am
म्हासुर्ली: हळूहळू हिवाळा सरत जात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. जसजशी उन्हाची तीव्रता वाढत जाईल, तसतसा घरात, दारात अगदी प्रवासातही उन्हाचा तडाखा असह्य होवून जाईल. मात्र, कधीकधी याच प्रवासात दुतर्फा डेरेदार वृक्षांची शाल पांघरूण गडद सावलीत प्रवाशांना नितळ गारवा देणारे जिल्ह्यातील काही रस्ते कात टाकत आहेत. परिणामी अनेक वर्षांचे सखे सोबती बनलेले हेच वृक्ष रस्ता रुंदीकरणात उन्मळून पडले आहेत. सुसाट वाहतुकीने सजणारे हेच रस्ते प्रगतीचे पुढचे पाऊल ठरत आहेत. मात्र, अनेक वर्षांच्या सावलीपासून पोरके होऊ लागले आहेत. (Gaganbawada Kolhapur Road)
गगनबावडा - कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावरील कळे- कोल्हापूर रस्ता हा कोकणसह कुंभी, धामणी, कासारी या तीन खोऱ्यांना जोडत पुढे कोल्हापूरला जातो. दिवसागणिक वर्दळीचा हा रस्ता वाढत्या वाहनांमुळे वाहतुकीस अपुरा ठरु लागला. त्यामुळे विस्तारीकरणासह रस्ता सुधारणेचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला. दोन वर्षापूर्वी सुरु झालेले या रस्त्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. दुपदरीकरण झालेल्या रस्त्यावरूण वाहनांनी सध्या वेग धरला आहे. यात वेळेचीही बचत झाली आहे . मात्र, रुंदीकरणात प्रवाशांच्या डोक्यावर अनेक वर्षांची छाया बनून राहिलेली शेकडो डेरेदार झाडे ना पर्यायाने तोडली गेली आहेत. एकीकडे वाहने सुसाट धावत असली, प्रवास सोयीस्कर होत असला तरी हरवलेल्या गडद सावलीच्या आठवणीत रस्त्याचे उजाड रूप प्रवाशांच्या मनाला मात्र काहीशी सल देत आहे. (Gaganbawada Kolhapur Road)
कोल्हापूर - गगनबावडा -तळेरे या राष्ट्रीय महामार्गाचे करूळ घाटासह ठिकठिकाणी रुंदीकरणासह, काँक्रीटीकरणाचे काम चालू आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लावलेल्या झाडांचे विस्तीर्ण डेरेदार झाडांत रूपांतर झाले होते. दाट सावलीने झाकलेला रस्ता आजवर प्रवाशांच्या मनाला भावत होता. या पैकी आसगाव - कळे - कोल्हापूर या रस्त्याचे काम भोगावती नदीवरील पूल, व किरकोळ कामे वगळता पूर्णत्वाकडे जात आहे. या रस्त्यामुळे जिल्ह्याच्या पश्चिमेकडील गावे दळणवळणाच्या दृष्टीतून सुलभरित्या शहराला जोडली जात आहेत. या मार्गावरून कोकणची वाहतूक काहीशी खंडित असली तरी नजीकच तीही सुसाट होणार आहे.
अर्थातच कोकणच्या पर्यटन वाढीसही चालना मिळणार असून या मार्गांवरील छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या व्यवसायांना उर्जितावस्था प्राप्त होणार आहे. मात्र, रस्ता रुंदीकरणात स्वातंत्र्यपूर्व काळात लावलेल्या झाडांचे विस्तीर्ण डेरेदार वृक्षांत रूपांतर झाले होते. दाट सावलीने झाकोळलेला रस्ता प्रवाशांच्या मनालाही भावत होता. मोजकीच झाडे वगळता सर्रास झाडे तुटली आहेत. परिणामी अनेक वर्षांची सोबती बनून राहिलेली सावली नाहीशी झाली आहे. (Gaganbawada Kolhapur Road)
ताजी भाजीही मिळेनाशी झाली
या मार्गावर वाकरे, कोपार्डे आदी गावांठिकाणी रस्त्याकडेला झाडांच्या सावलीखाली शेतातून आणलेल्या ताज्या भाजीच्या विक्रीसाठी दिवसभर ओळीने काही शेतकरी महिला बसत होत्या. कामानिमित्त शहरात गेलेले लोक तर नेहमीच्या कामावरून गावी परतणारे लोक शेतातील ताजी भाजी म्हणून आवर्जून घेत होते. त्यामुळे रस्त्याकडेला भाजी विक्रीचा व्यवसाय तेजीत होता. मात्र, सावली हटल्याने हिरव्यागार भाजीच्या रांगेत दिसणाऱ्या बुट्ट्या दिसेनाशा झाल्या आहेत.