Parbhani :- परभणीत संपूर्ण जिल्ह्याचा कारभार हाकणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातच बेशिस्तपणे वाहनांची पार्किंग सध्या केली जात आहे. ज्या ठिकाणावरून संपूर्ण जिल्ह्याचा कारभार चालतो. त्याच ठिकाणी नियम पाळले जात नसतील तर इतरांनी काय आदर्श घ्यावा, हा प्रश्न पुढे येत आहे. ज्या ठिकाणी नो-पार्किंगचे (No Parking)फलक लावले आहेत त्याच ठिकाणी नागरिक व कार्यालयातील कर्मचारी राजरोसपणे वाहन पार्किंग करीत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रवेशद्वारा पर्यंत दुचाकींची पार्किंग..
एवढ्यावरच ते थांबले नसून चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रवेशद्वारापर्यंत वाहने पार्किंग करण्याची मजल होत आहे. या सर्व गंभीर बाबीकडे खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून बेशिस्तपणे पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई(action) करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात एक शिस्त असायला हवी. येथे प्रवेशव्दाराजवळून आत गेल्यानंतर उजव्या बाजूला नो- पार्किंगचे दोन फलक लावण्यात आले आहेत. पण याच ठिकाणी फलकावरची सूचनेचे पालन होत नाही. त्यामुळे खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश द्यावे. अशी मागणी होत आहे.