Published on
:
22 Jan 2025, 10:54 am
Updated on
:
22 Jan 2025, 10:54 am
देवळा | राज्यात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसोबत शेतरस्त्यांचा प्रश्न ज्वलंत बनत चालला असून, या प्रश्नावर महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे शरद पवळे व राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी शेतरस्त्यांच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभर ऐतिहासिक आंदोलनाच्या माध्यमातून न्यायालयीन लढा देत जनजागृती केली असून , या कामी चळवळीच्या नेत्यांनी मुंबईत महसुलमंत्री चंदशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन शासनाने शिव पांदन रस्त्यांचा प्रश्न तात्काळ मार्गी लागावा या मागण्यांचे निवेदन सादर केले.
ना. बावनकुळे यांनी याकामी न्याय देण्याची भूमिका घेऊन संबंधीत अधिकाऱ्यांना शिव पानंदचे मुद्दे शासन निर्णयात घेण्याच्या सुचना यावेळी दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही निवेदन दिले असून, त्यांनीही संबंधित विभागांना तातडीने लक्ष घालून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. निवेदनात राज्यातील सर्व शिव पानंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चिती करून दर्जेदार शेतरस्ते करा, तहसिल कार्यालयांतील प्रलंबित शेतरस्ता केसेस तातडीने निकाली काढा,ग्रामशेतरस्ता समित्या स्थापनेचे आदेश तातडीने देवून त्यांचा अहवाल घेवून कार्यवाही करावी,वहिवाटीच्या रस्त्यांचे सर्वेक्षण करून नकाशावर घ्यावेत,शेतरस्त्यांना नंबरी लावुन त्यांचे सर्वेक्षण करावे व नंबरी हटवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी,मा.उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर दाखल याचिका क्रं.8287/2023 रोजीच्या निकालानुसार राज्यातील सर्व तहसिल कार्यालयांना 60 दिवसांच्या आत शेतरस्ते खुले करण्याचे आदेश द्यावेत,नकाशावरील शासकीय शेतरस्त्यांना वादी म्हणून सरकारचा प्रतिनीधी असावा, वाटपत्रात शेतरसत्याचा उल्लेख झाल्याशिवाय वाटपत्र करू नये, शेतरस्त्या अभावी पडीक राहणाऱ्या जमिनधारकांना विनाअट नुकसान भरपाई द्यावी अशा विविध मागण्या शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी चळवळीच्या माध्यमातून मंत्र्याकडे केल्या आहेत.
समृद्ध महाराष्ट्रासाठी शेतकरी समृद्ध व्हावा या उद्देशाने प्रत्येक सरकारने शासन निर्णय बनवले परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास आपण कुठेतरी कमी पडलो त्यामुळेच शेतकऱ्यांचा पिढ्यानपिढ्या शेतरस्त्यांसाठी प्रशासकीय न्यायालयीन संघर्ष सुरूच आहे . त्यामुळे त्यांचे शारीरिक मानसिक आरोग्य धोक्यात आल्यामुळे त्यांना न्याय मिळून देण्यासाठी शिव पानंद शेतरस्ता चळवळीच्या माध्यमातून शेवटच्या शेतकऱ्याला दर्जेदार शेतरस्ता मिळवून देण्यासाठी राज्यव्यापी लढा सुरू केला आहे
- शरद पवळे, दादासाहेब जंगले पाटील(महाराष्ट् राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळ)