Published on
:
22 Jan 2025, 10:56 am
Updated on
:
22 Jan 2025, 10:56 am
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने गांधीनगर, पिंपरीसमोरील महिंद्रा कंपनीच्या जागेत मध्यवर्ती अग्निशमन मुख्यालय उभारण्यात येणार आहे. त्यात 8 मजली प्रबोधिनी इमारत, 15 मजली निवासी इमारत, 22 अग्निशमन बंब बसतील अशी पार्किंग, अग्निशमन कार्यालय व कार्यशाळा, संग्रहालय व प्रेक्षागृह असणार आहे. त्यासाठी तब्बल 126 कोटी 24 लाख 30 हजार 273 रूपये खर्च करण्यात येणार आहे.
अग्निशमन विभागाचे मध्यवर्ती मुख्यालय सध्या संत तुकारामनगर येथे आहे. तेथील जागा अपुरी पडत असल्याने नव्या प्रशस्त ठिकाणी मुख्यालय बांधण्याचा नियोजन होते. गांधीनगर, पिंपरी येथील महिंद्रा कंपनीकडून ‘आयटूआर’ अंतर्गत मिळालेल्या 5.5 एकर जागेत हे मुख्यालय बांधण्यात येणार आहे.
त्या जागेत 8 मजली प्रबोधिनी इमारत उभारली जाणार आहे. त्या फायरमन व कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर, अग्निशमन विभागात काम करणारे फायरमन, जवान, चालक व इतर कर्मचार्यासाठी 15 मजली निवासी इमारत बांधण्यात येणार आहे. त्यात 22 अग्निशमन बंब उभे करता येतील, अशी प्रशस्त पार्किंग असणार आहे. तसेच, अग्निशमन कार्यालय व कार्यशाळा असणार आहे. अग्निशमन संग्रहालय, दोनशे जणांच्या आसन क्षमतेचे प्रेक्षागृह, 50 आसन क्षमतेचे सेमिनार रूम, 100 प्रशिक्षणार्थी व 118 अधिकारी व कर्मचार्यांच्या निवासाची व्यवस्था असणार आहे. तसेच, कवायत करण्यासाठी मैदान असणार आहे. इतर वाहनांची दोन मजली पार्किंग व्यवस्था आहे.
या मुख्यालयास गांधीनगर झोपडपट्टीच्या बाजूने प्रवेशद्वार आहे. भविष्यात इतर बाजूने इतर मार्ग शोधण्यात येणार आहेत. मात्र, अग्निशमन बंब ये-जा करण्यास दर्शनी भागात पुरेशी जागा उपलब्ध नसल्याचे वाहतुकीचा खोळंबा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या प्रकल्पासाठी स्थापत्य प्रकल्प विभागाने 150 कोटी 91 लाख 82 हजार 175 रुपये खर्चाची निविदा काढली होती. त्यासाठी 11 ठेकेदारांनी सहभागी घेतला. त्यातील 8 ठेकेदार पात्र ठरले. त्यातील बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा. लि.ची 16.40 टक्के लघुत्तम दराची व 126 कोटी 24 लाख 30 हजार खर्चाची निविदा स्वीकृत करण्यात आली आहे. तब्बल 16.40 टक्के कमी दर सादर केल्याने शिर्के कन्स्ट्रक्शनकडून 13 कोटी 30 लाख रुपये अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम म्हणून 10 जानेवारीला जमा करून घेण्यात आले आहेत. या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मंगळवारी (दि.21) मान्यता दिली आहे.
नव्या महापालिका भवनामुळे अग्निशमन मुख्यालयाचा प्रस्ताव रद्द
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने गांधीनगर, पिंपरी येथील महिंद्रा कंपनीच्या जागेत मध्यवर्ती अग्निशमन मुख्यालय बांधण्याचा निर्णय झाला होता. पुढे त्या ठिकाणी महापालिका भवनाशेजारी जागा असल्याने महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यात निर्णय झाला. त्यासाठी दोन्ही इमारती पादचारी मार्गाने जोडण्यात येणार होत्या. तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेचे इमारत दर्शनी भागात हवी, असे सांगितल्याने तत्कालिन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तो निर्णय रद्द केला. त्यानंतर चिंचवड येथील सायन्स पार्कसमोर 18 मजली महापालिका भवन उभारण्याचा निर्णय झाला. ते काम सध्या वेगात सुरू आहे. त्यामुळे आता गांधीनगरच्या जागेत अग्निशमन मुख्यालय बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वाढत्या शहरासाठी मध्यवर्ती ठिकाणी सुसज्ज असे अग्निशमन मुख्यालय
पिंपरी-चिंचवड शहरात लोकवस्ती वाढत आहे. शहरासाठी मध्यवर्ती अग्निशमन मुख्यालयाची गरज होती. त्यादृष्टीने अद्ययावत असे व सर्व सुविधायुक्त मुख्यालय येथे उभारण्यात येणार आहे. मुख्यालयाद्वारे पिंपरी-चिंचवड परिसरातील अग्निशमन सेवेची कार्यक्षमता व प्रशिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा उद्देश आहे, अशी माहिती महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी दिली.