जळगाव येथील पाचोरा जवळील परधाडे रेल्वे स्थानकानजिक भीषण अपघाताने खळबळ उडाली आहे. पुष्पक एक्सप्रेसने अचानक ब्रेक दाबल्याने चाकांच्या घर्षणामुळे धूर आल्याने आग लागल्याची अफवा पसरुन पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवासी रुळांवर उतरले असताना दुसऱ्या दिशेने आलेल्या कर्नाटक एक्सप्रेसने रेल्वे प्रवाशांना चिरडल्याने सात ते आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्याने दिली आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स माध्यमावर पोस्ट केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात एक्सवर ( आधीचे ट्वीटर) पोस्ट केली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून, जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत. 8 रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपातकालिन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
विजय वडेट्टीवार यांची मागणी
जळगावजवळ पाचोरा येथे पुष्पक एक्स्प्रेस मधील प्रवाशांनी भीतीने गाडीतून उड्या मारल्याने समोरून येणाऱ्या ट्रेनने धडक दिल्याने भीषण अपघात झाला झाल्याची दुर्दैवी घटना मन सुन्न करणारी आहे. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत आठ प्रवाशांचा मृत्यू झाला असून १२ प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघाताने अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जखमी प्रवाश्यांना उपचारासाठी आवश्यक सर्व सुविधा सरकारने तातडीने उपलब्ध करून द्यावे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी.रेल्वे प्रशासनाने या घटनेची चौकशी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य ती पावले उचलावी असे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.