सांगली : बांधकाम खाते, नगरपंचायत, ठेकेदार , लोकप्रतिनीधींनी संगनमताने मंदिर पाडलेpudhari photo
Published on
:
22 Jan 2025, 4:33 pm
Updated on
:
22 Jan 2025, 4:33 pm
आटपाडी : आटपाडी शहरातील श्री सिद्धनाथ मंदिराच्या पुढील काही भाग सार्वजनिक बांधकाम खाते,नगरपंचायतचे मुख्याधिकारी, ठेकेदार आणि लोकप्रतिधींनी संगनमताने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला शासकीय जागा शिल्लक असताना पाडण्यात आल्याचा आरोप आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत भाजप युवामोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या समवेत तीव्र निषेध व्यक्त करत आंदोलन केले. मंदिराचे बांधकाम होईपर्यंत रस्त्याचे काम रोखण्याचा इशारा दिला.
शहरातील साईमंदिर ते बसस्थानक रस्त्याच्या कामाच्या पहिल्या टप्प्यात आटपाडीचे आराध्य दैवत श्री सिद्धनाथ मंदिराच्या पुढील भाग पाडल्याचे निदर्शनास येताच श्री सिध्दनाथ मंदिराच्या परिसरात अनिल पाटील,महेश पाटील , विकास भुते व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून या घटनेचा निषेध करत आंदोलन केले.
यावेळी पाटील म्हणाले, हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराचे बांधकाम पडल्याने नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. मंदिर पाडताना नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याची आवश्यकता होती. रस्त्याच्या एका बाजूला 40 मीटर जागा शिल्लक असताना कोणाचे तरी हित जोपासण्यासाठी रस्त्याच्या बाजूचे घर वाचवण्यासाठी देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी सरकार असताना संगणमताने मंदिराचे बांधकाम पाडल्याचा आरोप केला.
सार्वजनिक बांधकाम खाते, नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याचे काम करताना दक्षता घेतली नाही.मुख्याधिकारी यांनी काम सुरु करण्यापूर्वी अतिक्रमणे आहेत का नाहीत हे बघितले नाही.दोन्ही विभागानी जबाबदारीने काम केले नाही.त्यामुळे अनिल पाटील यांनी या चुकीच्या कारवाईबाबत अपेक्षित उत्तर मिळत नाही. तोपर्यंत हे काम बंद राहील ते सुरु करू देणार नाही असा इशारा दिला.
आटपाडी शहरातील साईमंदिर ते साठे चौक दरम्यान होणाऱ्या या रस्त्याच्या कामास सुरुवात झाल्यावर मंदिराचा काही भाग पाडण्याच्या मुद्द्यावरून राजकीय संघर्षाची ठिणगी पडली आहे.त्यामुळे दीर्घ काळच्या प्रतीक्षेनंतर मिळालेली मंजुरी आणि त्यानंतर सुरु झालेल्या या कामाला खो बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शासकीय यंत्रणा आणि नगरपंचायत आणि लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी समन्व्यय साधत संवाद साधत रस्त्याचे काम मार्गी लावावे अशी अपेक्षा होत आहे.
आटपाडी शहरातील साईमंदिर चौक ते साठे चौक या रस्त्याच्या कामासाठी कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.रस्त्याचे काम करताना गटार बांधकाम देखील सुरु आहे. काही ठिकाणी गटार उंच झाल्याने आसपासच्या खोल असलेल्या घरातील सांडपाणी गटारात कसे सोडले जाणार? असा सवाल अनिल पाटील यांना केला.
आटपाडी शहरात रस्त्याचे काम सुरु झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातच अतिक्रमणाचा मुद्दा ऐरनीवर आला आहे. बसस्थानक, सांगोला रस्ता,बाजारपटांगण परिसरात काम करताना देखील शासकीय जागेत अनेक ठिकाणी अतिक्रमणे आहेत. त्यामुळे अतिक्रमण केल्याचा मुद्दा पुन्हा पुन्हा उपस्थित होणार आहे. ही अतिक्रमणे काढली जाणार का? का त्यांना देखील बगल दिली जाणार असा सवाल उपस्थित होत आहे.
रस्त्याचे काम करताना विजेचे खांब योग्य पद्धतीने बसवण्यात आलेले नाहीत.काम करताना ते कसे चाललंय हे बघण्यासाठी गेल्यावर डिझाईन,मापं,अलाईनमेंट दाखवले नाही. कोणाला तरी खूष करण्याचे काम केले जात आहे. हे सर्व थांबवण्यासाठी शहराच्या विकासासाठी सर्वानी जागरूक राहून एकत्र येऊन मार्ग काढण्याचे आवाहन इंजिनियर महेशकुमार पाटील यांनी केले.
आटपाडी शहरातील साई मंदिर चौक ते साठे चौक पर्यंतचा मुख्य रस्ता हा राज्यमार्ग आहे. रस्त्याचे काम हे दि.१० जानेवारी २०२४ रोजीच्या नगरविकास विभागाकडील शासन निर्णयान्वये वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत मंजूर आहे. शासन निर्णयानुसार कार्यान्वयन यंत्रणा ही सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. कामाची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता ही सार्वजनिक बांधकाम विभाग आटपाडी यांच्यामार्फत घेण्यात आलेली आहे. रस्त्याच्या बाजूस असलेले गटर / ड्रेनेज हे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. रस्त्याचे संपूर्ण सर्वेक्षण व त्याबाबतच्या सर्व रस्त्याच्या कामाबाबत अंदाजपत्रके, लाईनआउट व रस्त्याची मालकी ही सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. नगरपंचायतीमार्फत पाणीपुरवठ्याची पाईपलाईन त्यांनी केलेल्या मार्किंग नुसार करण्यात येत आहे. रस्त्याचे संपूर्ण कामकाज सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होत असल्याने नगरपंचायतीचा यामध्ये कोणताही सहभाग नाही.
मुख्याधिकारी वैभव हजारे