पालकमंत्री ना.नितेश राणे यांची सचिन वालावलकर यांनी भेट घेतली. Pudhari Photo
Published on
:
22 Jan 2025, 4:28 pm
Updated on
:
22 Jan 2025, 4:28 pm
वेंगुर्ले : वेंगुर्ले उभादांडा नवाबाग येथील खाडीतील गाळ काढण्यात यावा, अशी मागणी जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना.नितेश राणे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.
मंत्री ना.नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून प्रथमच सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते. यावेळी ओरोस येथे सचिन वालावलकर यांनी ना.नितेश राणे यांची भेट घेतली. वेंगुर्ले तालुक्यातील वेंगुर्ले उभादांडा नवाबाग येथील खाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला आहे. खाडीपात्र पुर्णतः गाळाने भरल्याने येथील स्थानिक ग्रामस्थ व मच्छीमार बांधव यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
समुद्राच्या वाढत्या पाणीपातळीने आजूबाजूच्या क्षेत्राची धूप होत असून शेतीचेही नुकसान होत आहे. तसेच या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटन व्यवसाय करण्यासही अडचणी निर्माण होत आहेत. सदर खाडीतील गाळ काढल्यास या भागामधील मच्छीमारी व्यवसाय तसेच पर्यटन व्यवसायास मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार असून या भागातील होणारे नागरिकांचेही नुकसान टळणार आहे. यापूर्वी आपल्या बंदर खात्याच्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने या भागाचा सर्व्हे करून नवाबाग खाडीतील गाळ काढणेबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव तयार केलेला असुन अंदाजपत्रकही सोबत सादर करीत आहे. याबाबत वेंगुर्ले नवाबाग खाडीतील गाळ काढणे, या कामास आपण तात्काळ मंजूरी देऊन त्यासाठी निधी उपलब्ध करून दयावा, अशी मागणी श्री.वालावलकर यांनी निवेदनातून केली.