Published on
:
22 Jan 2025, 1:44 pm
Updated on
:
22 Jan 2025, 1:44 pm
जळगाव, पुढारी वृत्तसेवा : जळगावमध्ये बुधवारी मोठी दुर्घटना घडली. जळगाव आणि पाचोरा स्थानकादरम्यान आग लागल्याच्या भीतीने पुष्पक एक्स्प्रेसमधील अनेक प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या. याचदरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने प्रवाशांना धडक दिली. या दुर्घटनेत किमान ११ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याच्या भीतीमुळे पाचोऱ्या तालुक्याजवळील नांद्रा ते परधाडे दरम्यानच्या ठिकाणी दुसऱ्या रेल्वे ट्रॅकवर येणाऱ्या न्यू दिल्ली बंगळूर एक्स्प्रेसखाली येऊन ११ प्रवासी ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळी जिल्हाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन, रेल्वे डीआरएम आणि अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पुष्पक एक्स्प्रेसमधील प्रवासी गाडीतून खाली उतरून ट्रॅकवर आले होते. त्याचवेळी शेजारील ट्रॅकवरून बंगळूर एक्स्प्रेस जात असताना ही दुर्घटना घडली. आम्ही घटनास्थळी आहोत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि सर्वजण घटनास्थळी जात आहोत. आम्ही डीआरएम आणि रेल्वे अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहोत. उपलब्ध माहितीनुसार, ८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत, रेल्वे आणि रेल्वे रुग्णवाहिकांच्या अतिरिक्त रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी रवाना करण्यात येत आहेत. या घटनेविषयी अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची आकडा वाढण्याची भीती आहे. प्रशासन सर्वतोपरी मदत करत आहे, असे नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम एएनआय वृतसंस्थेशी बोलताना सांगितले.
Jalgaon Train Accident | नेमकं काय घडलं?
रेल्वे बोर्डाच्या माहिती आणि प्रसिद्धी विभागाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, "काही प्रवाशांनी पुष्पक एक्स्प्रेसमधील अलार्म चेन ओढली आणि ते गाडीतून खाली उतरले. याच दरम्यान बंगळूर- नवी दिल्ली कर्नाटक एक्स्प्रेस दुसऱ्या बाजूने येत होती. भुसावळहून अनेक लोक रेल्वेमध्ये चढले होते आणि त्यापैकी एकाने अलार्म चेन ओढली. त्यानंतर ते गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी भीतीने चुकीच्या पद्धतीने रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न केला असावा. तसेच ते रुळावर उभे असावेत. यामुळे त्यांना रेल्वेने धडक दिली. भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक घटनास्थळी रवाना झाले आहेत. वैद्यकीय पथक तेथे आहे. स्थानिक प्रशासनदेखील घटनास्थळी आहे. रेल्वेचे वरिष्ठ विभाग अभियंतादेखील तेथे आहेत. इतर वरिष्ठ डॉक्टर आणि रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे."