Published on
:
22 Jan 2025, 4:52 pm
Updated on
:
22 Jan 2025, 4:52 pm
वडवणी : आगर तांडा येथे गेल्या सहा दिवसांपासून घरात माणूस नसताना घरातील वस्तूला, कपड्याला अचानक आग लागते. या आगीमध्ये आतपर्यंत लाखोंचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागते, याचा उलगाडा करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती तांडा येथे बुधवारी (दि.२२) दाखल झाली. यादरम्यान अज्ञातांनी एका घेवड्याच्या गाठोड्याला आग लावून अचानक आग लागत असल्याचे भासवले. याचा सखोल अभ्यास करत 'अनिस' च्या पदाधिकाऱ्यांनी या आगीच्या घटनेचे गुढ स्थानिकांसमोर उघड केले.
वडवणी तालुक्यातील कुप्पा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या आगर तांडा येथे गेल्या सहा दिवसांपासून अचानक आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. याची माहिती मिळताच अनिसचे पदाधिकारी तांडा येथे दाखल झाले. यावेळी त्यांच्या जवळपास ओल्या घेवड्याच्या बियाणांच्या गाठोड्याला आग लागल्याची घटना घडली. त्यानंतर पोलिसांसह 'अनिस' च्या पदाधिकाऱ्यांनी तांडा येथील लोकांना एकत्र करत या प्रकरणाचा शोध घेतला. प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी केली. त्यानंतर काही व्यक्ती जाणूनबाजून अशा आगीच्या घटना घडवून आणत असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी ग्रामस्थांना अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्याध्यक्ष यांनी सखोल मार्गदर्शन करून विविध आग लागण्याचे प्रयोग करून दाखवले व आगर तांडा येथे घडत असलेल्या आगीच्या घटना या भुताटकी किंवा भानामती नसून मानव निर्मित घटना असल्याचा अभिप्राय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिला आहे. आगीचे प्रकरण घडवून आणणाऱ्या व्यक्तीचे नाव जाहीर न करता त्या व्यक्तीला गुपित ठेवले असून यापुढे अचानक आग लागणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे जर आग लागली तर पोलीसांना त्या व्यक्तींची नावे दिली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे, बीड जिल्हाध्यक्ष हनुमंत भोसले, लातूर जिल्हा प्रधान सचिव सुधीर भोसले, अतुल बडवे, मनीषा बिक्कड, तेजस शिंदे यांच्यासह सपोनि अमन सिरसट यांनी आपल्या पथकासह ही कामगिरी केली. यावेळी प्रयोग करून दाखविताना माजी जिल्हा परिषद सभापती जयसिंग सोळंके, बजरंग साबळे, सचिन लंगडे, विश्वास आगे, ग्रामसेवक नवनाथ राठोड, प्रदिप शेळके, वैभव मस्के उपस्थित होते.
आगर तांडा अचानक आग लागणे, कपडे पेटणे, हा प्रकार घडल्याची माहिती मिळताच आमची टीम या ठिकाणी दाखल झाली. ज्या ज्या घरात ही घटना घडली, त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींची चौकशी केली आणि यामध्ये आग लागण्याचे प्रकार हे मानवनिर्मित असून समाजकंटकांनी हाताने आग लागल्याचे निष्पन्न झाले .
माधव विश्वनाथ बावगे , राज्य कार्याध्यक्ष, अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य
आगीच्या घटनेबाबत माहिती मिळताच आम्ही तांड्यातील लोकांना मंदिरात एकत्र केले. व त्यांची चौकशी केली. यादरम्यान हा प्रकार काहींनी जाणूनबूजून केल्याची माहिती समोर आली.
अमन सिरसट , सहाय्यक पोलीस निरीक्षक, वडवणी