प्रवाशांनी सांगितला रेल्वे अपघाताचा थरार:म्हणाले - आग लागल्याची अफवा पसरली अन् विपरित घडले; कर्नाटक एक्सप्रेसने हॉर्न वाजवला नाही
3 hours ago
1
जळगावमधील रेल्वे अपघातात 11 प्रवाशांचा बळी गेला आहे, तर 40 हून अधिक जण जखमी झालेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या घटनेचा अंगावर शहारे आणणारा अनुभव सांगितला आहे. रेल्वे प्रवाशांनी सांगितले की, आमची गाडी जळगावहून निघाली होती. रेल्वे परधाडे स्थानकालगत पोहोचताच चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे घर्षण होऊन चाकातून ठिणग्या उडाल्या. तेव्हा रेल्वेतील एका प्रवाशाने आग लागल्याचा आरडाओरडा केला. यामुळे काही प्रवाशांनी लगेच रेल्वेतून उड्या मारल्या. त्याचवेळी विरुद्ध दिशेने कर्नाटक एक्सप्रेस येत होती. या एक्सप्रेसने या सर्वांना चिरडले. या घटनेत जवळपास 11 जण चिरडले गेले असावेत. कर्नाटक एक्सप्रेसने हॉर्न वाजवला नाही अन्य एका प्रवाशाने सांगितले की, ही घटना दुपारी 3.30 ते 4 च्या सुमारास घडली. आमच्या रेल्वेत आग लागल्याची अफवा पसरली होती. त्यानंतर काही जणांनी रेल्वेतून उड्या मारल्या. त्याचवेळी कर्नाटक एक्सप्रेस समोरून येत होती. या एक्सप्रेसने 30 ते 35 जणांना चिरडले. या घटनेत अनेकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने रुळावर प्रवासी असताना हॉर्नही वाजवला नसल्याचा आरोप काही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. कर्नाटक एक्सप्रेसने हॉर्न वाजवला असता तर कदाचित प्रवासी सावध झाले असते असे त्यांचे म्हणणे आहे. सध्या पुष्पक एक्सप्रेसला पाचोरा रेल्वे स्थानकात आणण्यात आले आहे. रेल्वेच्या मध्य रेल्वेच्या PRO ने सांगितला घटनाक्रम मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी सांगितले की, पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवाशांनी रेल्वेची चेन ओढली होती. त्यानंतर काही प्रवाशी रेल्वेतून उतरून दुसऱ्या ट्रॅकवर उभे राहिले. त्या प्रवाशांना दुसऱ्या दिशेने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने उडवले. ही रेल्वे बंगळुरूहून दिल्लीकडे जात होती. या घटनेत 7 ते 8 प्रवाशी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी स्थानिक रुग्णालय व प्रशासनाची मदत घेतली जात आहे. याशिवाय भुसावळ रेल्वे स्थानकावरील आपत्कालीन रेल्वे गाडीही घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाली आहे. या प्रकरणी जखमी प्रवाशांपर्यंत लवकरात लवकर मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घटनेत किती जणांचा मृत्यू झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही, पण अनेकांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)