पिक विमा घोटाळा साडे तीनशे कोटीचा असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. पण भाजपचेच आमदार सुरेश धस यांनी सरकारचं हे म्हणणं फेटाळून लावलं आहे. पिक विमा योजनेचा घोटाळा हा पाच हजार कोटीच्या वर आहे, असा दावा करतानाच या मुद्द्यावर माझ्याशी कुठेही चर्चा करायला या. मी तयार आहे, असं आव्हानच सुरेश धस यांनी थेट राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दिलं आहे. त्यामुळे सुरेश धस आणि माणिकराव कोकाटे यांच्यात या मुद्द्यावरून जुंपण्याची शक्यता अधिक आहे.
भाजप आमदार सुरेश धस मीडियाशी संवाद साधत होते. तुम्ही पिक विमा कर्जाच्या घोटाळ्यावर भाष्य केलं. त्यामुळे सव्वा चार लाख कर्ज अवैध असल्याचं समोर आलं. सरकारचं मोठं नुकसान होताना वाचलं, असं सुरेश धस यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी हा मुद्दाच फेटाळून लावला. सरकारचं नुकसान वाचलं नाही. तुम्ही थोडं मागे जाऊन पाहा. काही शेतकऱ्यांनी कर्जाचे पैसे उचलून नेले आहेत. त्यामुळे शासनाचे पैसे वाचले असं म्हणता येत नाही. शासनाने फक्त साडेतीनशे कोटी रुपयांचा घोटाळा दाखवला. पण माझं मत आहे की हा भ्रष्टाचार पाच हजार कोटीच्यावर जाणार आहे, असा दावा सुरेश धस यांनी केला आहे.
फडणवीस यांना पत्र देणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या परदेशात आहेत. ते परदेशातून आल्यावर मी त्यांना पिक विमा कर्जातील घोळाबाबतचं पत्र देणार आहे. त्यावर काय कारवाई करायची तो अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय की सखोल चौकशी नेमू. सखोल चौकशी नेमा. कमिशनर किंवा सचिवाच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी धस यांनी केली आहे.
सेंटर एकाच तालुक्यात कसे?
या घोटाळ्यातील सीएससी सेंटरवाले प्यादे आहेत. हे सेंटर एकाच तालुक्यात कसे जातात? सर्व शेतकरी दोषी आहेत असं म्हणत नाही. ठरावीक शेतकरी दोषी आहेत. आठ जिल्ह्यात पीक विमा भरणारे शेतकरी एक शेतकरी असू शकतो का?, असा सवाल सुरेश धस यांनी केला.
तुम्ही आताच चार्ज घेतला
सुरेश धस यांचे आरोप राजकीय आहेत, असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले होते. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. माझे आरोप राजकीय नाहीत. माझं कृषीमंत्र्यांना चॅलेंज आहे. टीव्हीवर किंवा कुठेही चर्चेला या. पाच हजार कोटींच्यावरचा हा घोटाळा कसा झाला ते सांगतो. हा साडे तीनशे कोटीचाच घोटाळा नाही. टोटल कागदपत्रे देतो. पाच हजार कोटीचा घोटाळा आहे. तुम्ही आता कृषीमंत्रीपदाचा चार्ज घेतला. तुम्हाला माहीत नसेल, असा चिमटाही त्यांनी काढला.