शहरातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी पोलिसांनी आक्रमक धोरण राबवले आहे. दोनपेक्षा जास्त गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येत असून, त्यांना तडीपार, स्थानबद्ध किंवा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत अटक करण्यात येत आहे. वर्षभरात 630 सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अक्षरशः रडकुंडीला आणले आहे.
अनपेक्षित दणका
मागील वर्षभरात तब्बल 630 सराईत गुन्हेगारांवर कारवाई झाली असून, यातील बहुतांश गुन्हेगार निर्ढावलेले आणि राजकीय वरदहस्त लाभलेले आहेत. आपण काहीही कृत्य केले तरी आपल्याला काहीच होणार नाही, या भ्रमात असलेल्या गुन्हेगारांना पोलिसांनी कठोर कारवाईतून धडा शिकवला आहे. अनेकांना तडीपार, स्थानबद्ध किंवा मोक्काअंतर्गत अटक करण्यात आले. या कठोर धोरणामुळे शहरात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाल्याचे दिसून येत आहे.
दुसर्या गुन्ह्यानंतर रडारवर, तिसर्यांदा थेट कारवाई
पिंपरी - चिंचवड पोलिसांच्या धोरणानुसार, एखाद्या व्यक्तीवर दुसर्यांदा गुन्हा दाखल झाला, तर ती व्यक्ती थेट पोलिसांच्या रडारवर येते. त्यानंतर त्या व्यक्तीवर सतत लक्ष ठेवले जाते. त्या व्यक्तीवर तिसर्यांदा गुन्हा नोंदवला गेला, तर कोणत्याही संधीची वाट न पाहता थेट कठोर कारवाई करण्यात येते. या धोरणाचा उद्देश सराईत गुन्हेगारांना वारंवार गुन्हे करण्यापासून रोखणे आहे. या धोरणामुळे अनेक गुन्हेगारांनी धसका घेतल्याचे दिसत आहे.