टीम इंडियाचा कसोटी आणि वनडे कर्णधार रोहित शर्मा 10 वर्षांनंतर रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे.
Published on
:
22 Jan 2025, 11:43 am
Updated on
:
22 Jan 2025, 11:43 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma Ranji Match : टीम इंडियाचा कसोटी आणि वनडे कर्णधार रोहित शर्मा 10 वर्षांनंतर रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे. गुरुवारपासून सुरू होणाऱ्या जम्मू आणि काश्मीरविरुद्धच्या सामन्यासाठी रोहितची मुंबई संघात निवड झाली आहे. त्याच्याशिवाय युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालचाही मुंबई संघात समावेश आहे. मुंबईचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करेल.
अलीकडेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) राष्ट्रीय संघातील खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणे अनिवार्य केले आहे. त्यानुसार सर्व वरीष्ठ खेळाडूंना रणजी स्पर्धेत खेळावे लागणार आहे. बीसीसीआयच्या कडक भूमिकेनंतर, स्टार खेळाडूंनी या स्पर्धेसाठी स्वतःला उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे रोहित शर्मानेही याबाबत निर्णय घेतला असून तो मुंबईकडून रणजी सामना खेळताना दिसेल. तो जवळजवळ एक दशकानंतर मुंबई संघाकडून देशांतर्गत स्पर्धेत खेळताना दिसणार आहे.
या हंगामात प्रथमच रणजी करंडक स्पर्धेचे दोन टप्प्यात आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, दोन सर्वात मोठ्या मर्यादित षटकांच्या स्पर्धा सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफी आणि विजय हजारे वनडे ट्रॉफी या पार पडल्या आहेत. तर रणजी ट्रॉफीच्या पहिल्या टप्प्यात सर्व संघांनी प्रत्येकी पाच सामने खेळले आहेत.
रोहित-यशस्वी सलामीला येणार?
रोहितने नोव्हेंबर 2015 मध्ये शेवटचा रणजी सामना खेळला. त्यावेळी तो उत्तर प्रदेश संघाविरुद्ध मैदानात उतरला होता. गतविजेता मुंबई संघ गुरुवारपासून बीकेसी येथील शरद पवार क्रिकेट अकादमीमध्ये जम्मू-काश्मीरविरुद्ध रणजी करंडकाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करणार आहे. खराब फॉर्ममधून जात असलेल्या रोहितने ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर स्थानिक क्रिकेट खेळण्याबाबत सकारात्मकता दर्शवली. जम्मू-काश्मीर विरुद्धच्या सामन्यात तो यशस्वी जैस्वालसह डावाची सुरुवात करू शकतो.
दरम्यान, टीम इंडियाला इंग्लंड विरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायची आहे. अशा परिस्थितीत रोहितला फॉर्ममध्ये परत येणे खूप महत्वाचे आहे. तथापि, त्यामुळेच तो अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाकडून खेळण्यास सज्ज झाला आहे. मुंबईला त्यांच्या पुढील सामन्यात जम्मू-काश्मीर संघाकडून कठीण आव्हान मिळेल. जम्मू-काश्मीर संघ सध्या एलिट ग्रुप अ मध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.
स्टार फलंदाज विराट कोहली मानेच्या दुखापतीमुळे रणजी ट्रॉफीच्या पुढील फेरीत दिल्लीकडून खेळू शकणार नाही, परंतु त्याने ३० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या गट टप्प्यातील अंतिम फेरीसाठी स्वतःला उपलब्ध करून दिले आहे. दिल्लीचा सामना राजकोटमध्ये दोन वेळा विजेता राहिलेल्या सौराष्ट्रशी होईल, जिथे ऋषभ पंतचा सामना त्याचे राष्ट्रीय संघातील सहकारी रवींद्र जडेजा आणि चेतेश्वर पुजारा यांच्याशी होईल. ग्रुप डी मधील हा सामना जिंकणे दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचे आहे. दिल्ली सध्या चौथ्या स्थानावर आहे तर सौराष्ट्र पाचव्या स्थानावर आहे. या गटात तामिळनाडू आणि चंदीगड पहिल्या दोन स्थानांवर आहेत. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील.